अकोला – अकोला (Akola) जिल्ह्यामध्ये दहावीची शालांत परिक्षा सुरु आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील परिक्षा केंद्रावर (Exam Center) गोपनीय भरारी पथकाव्दारे तपासणी करण्यात येत आहे. भारत विद्यालय (Bharat Highschool) , अकोला येथे गुरुवारी गणित विषयाचा पेपर दरम्यान विद्यार्थ्यांना शिक्षक तोंडी उत्तरे सांगत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर भरारी पथकाने अकोला येथील भारत विद्यालयातील दोन शिक्षकावर निलंबनाची कार्यवाही केल्याची माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली. कोरोनाच्या काळात दोन वर्षात विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने झाल्या. संसर्ग अधिक असल्यामुळे परीक्षा घेण शक्य झालं नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन घेण शक्य आहे. महाराष्ट्रात कुठेही कॉपीचा प्रकार घडू नये यासाठी गोपनीय भरारी पथकाव्दारे तपासणी करण्यात येत आहे.
गणिताच्या शिक्षकांनी तोंडी उत्तरे सांगितली
दोन वर्षानंतर अकोला जिल्ह्यामध्ये दहावीची शालांत परिक्षा सुरु आहे. परिक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपी सुरु असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारीनुसार मनपा शिक्षणाधिकारी व त्यांच्या पथकाव्दारे परिक्षा केंद्रावर तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. भारत विद्यालय येथे अधिकाऱ्यांनी परिक्षेदरम्यान भेट देऊन तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान एकूण 11 खोल्यांमध्ये 269 विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी खोली क्रमांक 302 मध्ये काही विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेवर पेन्सीलने लिहिलेले आढळून आले. त्याबाबत विद्यार्थ्यांची विचारणा केली असता गणिताच्या शिक्षकांनी तोंडी उत्तरे सांगून प्रश्नपत्रिकेवर तात्पुरते उत्तरे लिहण्याबाबत प्रवृत्त केल्याचे दिसून आले. यावेळी परिक्षा खोलीत पर्यवेक्षक सतिश सरकटे व गणिताचे शिक्षक देवदत्त उपस्थित होते. तसेच सदर प्रकाराबाबत विद्यार्थ्यांना विचारणा केली असता विद्यार्थ्यांने कॉपी प्रकरणाची कबूली दिली. विद्यार्थ्याने कबुली दिल्याने विद्यार्थ्यांला मारहाण झाल्याची तक्रार पालकांव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती.
अनुचित प्रकार घडणार नाही यांची नोंद सर्व शाळा व महाविद्यालयानी घ्यावी
तपासणी अहवालानुसार पर्यवेक्षक सतिश सरकटे व गणिताचे शिक्षक देवदत्त दोषी आढळून आले असून हा प्रकार अतिशय गंभीर असून दोषी शिक्षकांना तात्काळ निलंबीत करण्याची शिफारस विभागीय परिक्षा मंडळाकडे केली आहे. तसेच यानंतर असे अनुचित प्रकार घडणार नाही यांची नोंद सर्व शाळा व महाविद्यालयानी घ्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहे.