जगभरातील आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणा स्थान असलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमी येथील अंडरग्राऊंड पार्किंगला आंबेडकरी अनुयायांनी केलेला विरोध पाहून सरकारने या बांधकामाला स्थगिती देत असल्याचे विधीमंडळात जाहीर केले. नागपूरच्या दीक्षाभूमीतील अंडरग्राऊंड पार्किंग योजनेमुळे येथील स्तूपाला धक्का पोहचू शकतो त्यामुळे या पार्किंग विरोध करण्यासाठी सोमवारी दुपारी नागपूर येथे मोठे आंदोलन झाले. त्यानंतर येथे प्रचंड मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. अनेक राजकीय पक्षांनी या भूमिगत पार्किंगला विरोध केला आहे. त्यानंतर उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पार्किंगच्या कामाला स्थगिती देत असल्याचे विधीमंडळात या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
नागपूर दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंग साठी स्मारक समितीने एक आराखडा तयार केला होता. 200 कोटी त्यासाठी दिलेले आहेत. दीक्षाभूमी स्मारक समितीने हा आराखडा मान्य केलेला आहे. या ठिकाणी आज काही संघटनांनी आंदोलन केले आहे. हे अंडरग्राउंड पार्किंग करू नये म्हणून आंदोलन सुरु आहे.संपूर्ण आराखडा हा स्मारक समितीने मंजूर केलेला असला तरी हे स्मारक देशभरातील लाखो अनुयायांचे प्रेरणा स्थान आहे. त्यामुळे अशा स्वरुपाचे काम होताना सर्व पक्षीयांची भूमिका जाणून घेतली जाणार आहे. सरकारने केवळ निधी दिलेला आहे. परंतू सध्या लोकभावना लक्षात घेता या कामाला स्थगिती देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सांगितले. दीक्षाभूमी समितीची स्थानिक लोकांसोबत बैठक घेऊ त्यानंतर याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.
अशा वास्तू संदर्भात वेगवेगळी मते असणे योग्य नाही. एकमत झाल्यावर काम करू, स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे सरकारने निधी दिला आणि काम सुरु केले होते. आता चर्चेनंतर पुन्हा निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले.