मुंबई : अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचे (Tauktae Cyclone) परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह अनेक ठिकाणी याचा फटका बसला आहे. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असलेल्या तौत्के चक्रीवादळानं गती घेतली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी झाडांची पडझडही पाहायला मिळते. तसेच अनेक ठिकाणी बत्तीही गुल झाली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे. (Tauktae Cyclone Update effect Mumbai, Thane, Palghar Ratnagiri, Konkan and All Over Maharashtra)
सध्या तौत्के चक्रीवादळ हे मुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर आहे. तौत्के चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने सध्या त्याचा प्रभाव सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईत सध्या वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे.
मुंबईतील दादर, वरळी, लोअर परेल, माटुंगा, माहिमसह पश्चिम उपनगरात सर्वत्र जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईतील वरळी सी फेस, शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटा उसळताना पाहायला मिळत आहे. येत्या काही काळात मुंबईतील पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघरसह इतर आजूबाजूच्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान मुंबईत आतापर्यंत 34 ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडल्या आहेत. यात मुंबई शहर 11, पश्चिम उपनगर 17, पूर्व उपनगरात 6 ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी नाही.
Maharashtra: Light spell of rain and gusty winds seen in in view of Cyclone Tauktae; early morning visuals from Wadala area of Mumbai pic.twitter.com/ZD1SZ4r0e5
— ANI (@ANI) May 17, 2021
तौत्के चक्रीवादळाचा फटका संपूर्ण महाराष्ट्राला बसला आहे. काल रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर आता आणखी वाढला आहे. मुंबईपाठोपाठ ठाणे, नवी मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबईसह इतर ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, सिंधुदुर्ग, आंबोळगड यांसह इतर गावांना चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. रत्नागिरीतील 104 गावांमधील 800 ते 1 हजार घरांची पडझड झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील बहुतांश गावात वीज पुरवठा खंडित झाला आहे. रत्नागिरी, राजापुर, देवगड, मालवण, वेगुर्ले या भागातील बत्ती गुल झाली आहे. काही ठिकाणी काल दुपारपासूनच वीज पुरवठा खंडित झाला आहे. तौत्के चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरून आतापर्यंत 6 हजार 540 नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
कोकण किनारपट्टीसह पुणे, कोल्हापूर, अमरावती, वाशिम या जिल्ह्यातही सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. पुण्यात वादळी वारा आणि पावसामुळं झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, कोल्हापूर, सांगली या परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. एकीकडे जोरदार वारा आणि दुसरीकडे थंडीमुळे थंडीने हा परिसर गारठून गेला .
राज्यात एकीकडे कोरोनाचा हाहाकार असताना दुसरीकडे चक्रीवादळामुळे कोरोना लसीकरणाला ब्रेक लागला आहे. मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीलगतच्या बहुतांश जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस ही लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णालय, ऑक्सिजन, व्हेंटिलरसह, आयसीयूची सोय करण्यात आली आहे.
तौत्के चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी आर्थिक नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनानं मोठी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापनाची पथकं रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडच्या किनारपट्टीवर तैनात करण्यात आली आहेत. तसेच किनारपट्टीवरील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.
दरम्यान चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. समुद्र किनारी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Tauktae Cyclone Update effect Mumbai, Thane, Palghar Ratnagiri, Konkan and All Over Maharashtra)
संबंधित बातम्या :