नाशिक : नाशिकच्या राजकीय वर्तुळात एक मोठी चर्चा आहे. ठाकरे गटाचे नगरसेवक, पदाधिकारी हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू असतांना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आणि ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल एकाच वाहनाने प्रवास करतांना दिसून आले आहे. त्याचा व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे शिंदे गटात सुनील बागूल जाणार का ? अशी चर्चा होऊ लागली आहे. मागील आठवड्यात नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या कार्यक्रमाला हेमंत गोडसे यांनी उपस्थिती दर्शविल्याने हर्षदा गायकर यांचा शिंदे गटात प्रवेश होणार अशीही चर्चा सुरू झाली होती. मात्र, शिंदे गटात जाणार नसून उद्धव ठाकरे यांच्याच पक्षात राहणार असल्याचं स्पष्टीकरण देण्याची वेळ गायकर यांच्यावर आली होती. त्यावरून ठाकरे गटाच्या महानगर प्रमुख सुधाकर बडगूजर यांनी कोणीही शिंदे गटात जाणार नाही असे स्पष्टीकरण दिले होते. त्यातच आता उपनेते सुनील बागूल यांचा फोटो खासदार हेमंत गोडसे यांच्यासोबत असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सूरतवरुन गुवाहाटीला गेले होते, त्यावेळी ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल यांनी एक भावनिक पत्र लिहिले होते. त्यावरून बागूल हे राज्यभर चर्चेत आले होते.
काही वर्षांपूर्वी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत बागूल यांनी प्रवेश केला होता, त्यानंतर भाजपमध्ये बागूल होते आणि आता दीड वर्षापूर्वी बागूल यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला होता.
त्यामध्ये बागूल यांना बरेच दिवस कुठेलही पद दिलेले नव्हते, त्यामुळे बागूल नाराज असल्याच्या चर्चा होऊ लागल्याने बागूल यांची उपनेते पदी निवड करण्यात आली होती.
त्यातच आता बागूल यांच्या मातोश्री नगरसेवक असतांना खासदार गोडसे यांनी विकासकामांच्या करिता विकासनिधी दिला होता, त्याकरिता बागूल आणि गोडसे एकाच वाहनाने प्रवास करीत गेले होते.
त्यामुळे राजकीय वर्तुळात या सेनेच्या दोन्ही गटाच्या नेत्यांचा प्रवास चर्चेचा विषय ठरत असून येत्या काळात बागूल पक्ष बदलतात का याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.