Sushama Andhare Allegation Balaji Kinikar : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. सध्या ठाकरे गटाच्या महाराष्ट्रात अनेक प्रचारसभा पार पडत आहे. आता नुकतंच अंबरनाथमध्ये ठाकरे गटाची एक प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेवेळी ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यावर टीका केली आहे. कधीकाळी साधं छोटं क्लिनिक चालवणाऱ्या बालाजी किणीकर यांच्याकडे आज करोडोंची प्रॉपर्टी कुठून आली? असा सवाल ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
अंबरनाथ विधानसभेतील महाविकासआघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारासाठी सुषमा अंधारे यांनी शनिवारी अंबरनाथ विधानसभेतील उल्हासनगर कॅम्प 4 भागात सभा घेतली. यावेळी भाषणात त्यांनी शिंदे गटाचे स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यावर टीका केली. आमदार बालाजी किणीकर हे नेमके कुठे कष्ट करायला गेले होते? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थितीत केला आहे.
बालाजी किणीकर तुम्ही असा कोणता अल्लाउद्दीनचा दिवा घासला आणि कुठे इतकी मेहनत केली की ज्यामुळे तुमच्याकडे इतके पैसे आले? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. या चाळीसच्या चाळीस गद्दारांकडे पैसे आले, पण सर्वसामान्यांचा खिसा कापला गेला, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
याबाबत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप खोटे आहेत. मी डेंटिस्ट आहे, माझ्याकडे २ दवाखाने होते. माझी पत्नीही डेंटिस्ट असून मी शिवसैनिक म्हणून काम करत होतो. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला उमेदवारी दिली. गेली १५ वर्ष या शहराचं मी प्रतिनिधित्व करतोय. मी माझ्या ऍफिडेव्हिटमध्ये माझे व्यवसाय काय आहेत, याची माहितीही दिली आहे. मी काय कमावलं तेही दिलेलं आहे. मी खोटे ऍफिडेव्हिट देणारा माणूस नाही. जे सत्य आहे ते दिलेलं आहे. ताईंनी ते बघावं आणि मग माझ्यावर टीका करावी. ताई मोठ्या नेत्या आहेत, असे बालाजी किणीकर म्हणाले.