नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून (Shiv Sena) आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेकडून संजय राऊत यांची संसदीय नेतेपदावरुन गच्छंती करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाचं अस्तित्व मान्य केलं आहे. त्यामुळे शिवसेनेचा व्हीप ठाकरे गटाच्या खासदारांनी मानला नाही तर कारवाई होणर नाही, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांच्याऐवजी आता खासदार गजानन कीर्तीकर यांची मुख्य नेतेपदी वर्णी लावण्यानंतर आता ठाकरे गटाकडून हालचाली घडणं अपेक्षित आहे. याचबाबतची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
संजय राऊत यांची संसदीय नेतेपदावरुन गच्छंती केली ही शिवसेनेची एक कृती आहे. या कृतीवर सध्याच्या घडीला तरी ठाकरे गटाकडून कायदेशीरपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यात येणार नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत ठाकरे गटाकडून लोकसभेत पत्र दिलं जाणार नाही. संजय राऊत यांच्याऐवजी गजानन कीर्तीकर यांच्या नियुक्तीला आम्ही किंमत देत नाही. कोर्टाच्या निर्णयापर्यंत ठाकरे गट लोकसभेत हालचाल करणार नाही. लोकसभा अध्यक्षांना वेगळ्या गटाचं पत्र दिलं जाणार नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी आज दुपारीच शिवसेनेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “आम्ही खोके घेतले असते आणि गुडघे टेकले असते तर आम्ही त्या पदावर राहिलो असतो. आम्हालाही सांगण्यात आलं कशाला राहताय? काय राहिलंय? तुम्ही आमच्याकडे या. मी म्हटलं, मी थुकतो तुमच्या ऑफरवर. मी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आमची शिवसेना यांच्याशी बेईमानी करणार नाही. थुंकतोय तुमच्या ऑफरवर या भाषेत बोललो. असे अनेक पदं आम्ही ओवाळून टाकू. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही निष्ठावंत आहोत”, असं संजय राऊत म्हणाले.
“माझ्या पक्षाने मला जे दिलंय ते भरपूर दिलेलं आहे. निष्ठा राखण्यासाठी काही जात असेल तर आम्ही गमवायला तयार आहोत. पण एखाद्या पदासाठी लाचारी पत्कारणारा संजय राऊत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यावर जे संस्कार केले आहेत ना, ते निष्ठेचे आणि इमानदारीचे आहेत. पदासाठी, सत्तेसाठी गुडघे टेकण्यासाठी नाहीत. पद आज आहे, आज गेली उद्या परत येतील. तेवढी हिंमत आमच्या पक्षात आणि नेतृत्वात आहे”, असं संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं.