सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. एकीकडे विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. तर दुसरीकडे मात्र अयोध्या दौरा हा बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अयोध्या दौऱ्यावर जात असल्याचे मत शिंदे गटाकडून दिले जात आहे. त्यामुळे आता अयोध्या दौऱ्यावरून राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी आज अयोध्या दौरा काढला असला तरी गेल्या काही दिवसांपासून या दौऱ्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभा राहिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका झाल्यानंतर मत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.
ज्यांनी कधीही अयोध्या दौरा केला नाही. त्यांना या दौऱ्याचे महत्व काय वाटणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून त्यांच्यावर निशाणा साधताना म्हटले आहे की, रावण राज्य चालवून हे अयोध्या दौऱ्यावर निघाले आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाने म्हटले आहे की, शिवसेनेचे धनुष्य चोरून आणि केलेले पाप धुण्यासाठी म्हणून शिंदे गट अयोध्येला निघाला असल्याचे म्हटले आहे.
तर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी टीका करताना म्हणाले की, मुख्यमंत्री आणि चाळीस आमदार अयोध्येला गेले तरी त्यांनी आज महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास गमावला असल्याची टीका केली आहे.
तर आमदारांना दिलेली मंत्रिपदाची आश्वासने पूर्ण झाली नाहीत त्यामुळे आज 40 पैकी अनेक आमदार चलबिचल झाले आहेत, त्यांना नैराश्य आले आहे.त्यांची मनधरणी करण्यासाठी अयोध्या दौरा काढला आहे. मात्र त्यातील अनेक आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
ज्या आमदारांना घेऊन अयोध्या दौरा केला आहे ते एकत्र राहिले पाहिजेत म्हणून हा अयोध्या दौरा आयोजित केला असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अयोध्या दौरा केला असला तरी येणाऱ्या काळात उध्दव ठाकरे यांच्यावरच श्रीराम प्रसन्न होतील असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवले आहे.