ठाणे : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्यानंतर संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी रात्रीपासून रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या निर्देशाने कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (Thane CP Vivek Phansalkar Night Curfew Over Corona New Strain)
ठाणे शहरातील मुख्य चौक असणाऱ्या चिंतामणी चौक, नौपाडा तसेच मुख्य बाजारपेठ याठिकाणी ठाणे नगर पोलिसांकडून कडक नाकाबंदी करण्यात आली. या दरम्यान दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात येत असून पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता पाडवी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि स्थानिक पोलिस हे देखील स्वतः रस्त्यावर उतरले आहेत.
मंगळवारी रात्री 11 वाजेपासून 5 जानेवारीपर्यंत रात्रीच्या संचारबंदीचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात लागू असतील. यावेळी नियम मोडणाऱ्यांवर संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 144 कलम अंतर्गत जमाबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे असून 188 अन्वय कारवाई ठाणे पोलिस करीत आहे.
नाईट कर्फ्यूदरम्यान रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत केवळ वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना घरा बाहेर पडण्यास परवानगी असेल. विनाकारण फेरफटका मारण्यास, सायकल, मोटारसायकल किंवा गाडीने अनावश्यक बाहेर पडल्यास, कलम 188 द्वारे कारवाई केली जाणार आहे.
घराच्या बाहेर, इमारतीच्या गच्चीवर साजरे होणारे खाजगी समारंभ कोठेही रात्री 11 नंतर बाहेर येण्यास तसंच कार्यक्रम करण्यास सक्त मनाई मनाई करण्यात आली आहे. तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम घेण्यास, क्रीडा स्पर्धा ,हॉटेल आस्थापना, पब, क्लब, रिसॉर्ट इत्यादी सुरु ठेवण्यास मनाई असेल, असंही ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सांगितलं आहे.
नाईट कर्फ्यूदरम्यान वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या आस्थापना, अत्यावशक सेवा बजावणारे, अत्यावशक किंवा तातडीची वैद्यकीय गरज पुरवणारे तसेच दूध -भाजीपाला यांची वाहतूक सुरु असेल. दरम्यान ठाणे पोलीस आयुक्तालयात येणाऱ्या ठाणे-कळवा-मुंब्रा, कल्याण-डोंबिवली, भिवंडी शहर, अंबरनाथ-बदलापूर-उल्हासनगर अशा सर्व सर्व महानगरपालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यूचे नियम लागू असणार आहेत.
(Thane CP Vivek Phansalkar Night Curfew Over Corona New Strain)
संबंधित बातम्या
Night curfew : कशी राहिली मुंबईतील रात्रीच्या संचारबंदीची पहिली रात्र?