ठाणे : ठाण्यात पुन्हा एकदा गँगवॉरला ऊत आला आहे. आपल्या विरोधात साक्ष का दिली? म्हणून दोघा आरोपींनी विरुद्ध गँगच्या एका सदस्यावर चॉपरने सपासप वार केले. ठाण्यातील पत्त्यांच्या क्लबमध्ये घुसून आरोपींनी हल्ला केला. या घटनेचा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. (Thane Gang war Man attacked for giving court statement as witness)
ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील एका पत्त्यांच्या क्लबमध्ये हा प्रकार घडला. आरोपी मंदार गावडे आणि अभिषेक जाधव हे दोघे प्रथमेश निगुडकर या तरुणाला शोधत आले. तो समोर दिसताच हातातील धारदार चॉपरने दोघांनी प्रथमेशवर सपासप वार करायला सुरुवात केली.
मंदार आणि अभिषेक या दोघांनी प्रथमेशच्या डोक्यात, हातावर, मानेवर, छातीवर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार केले. प्रथमेश स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, नंतर दोन्ही आरोपींनी प्रथमेशला पत्त्याच्या क्लबच्या खाली नेले आणि तिथेही मारहाण केली. त्यानंतर प्रथमेशला त्याच अवस्थेत सोडून दोघेही पळून गेले. प्रथमेशवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिसांनी अभिषेक जाधवला ताब्यात घेतलं आहे.
गेल्या वर्षीच नवी मुंबईतील ऐरोली आणि ठाणे शहराच्या हद्दीवर असलेल्या गरम मसाला या हॉटेलमध्ये गँगवॉर झाला होता. प्रथमेश निगुडकर आणि त्याच्या साथीदारांवर मंदार गावडेने आपल्या टोळीतील सदस्यांसोबत गोळीबार केला होता. यात कोणालाही दुखापत झाली नव्हती.
या प्रकरणी न्यायालयात खटला सुरु असून प्रथमेश निगुडकर त्यात साक्षीदार आहे. या खटल्यात प्रथमेशची साक्ष महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रथमेशला शोधत मंदार आणि अभिषेक पत्त्याच्या क्लबमध्ये आले होते. आमच्या विरोधात तू साक्ष कशी देतो हेच पाहतो, असं बोलत आरोपींनी प्रथमेशवर वार केले.
संबंधित बातम्या :
(Thane Gang war Man attacked for giving court statement as witness)