“अक्षय शिंदेला फाशी द्या म्हणणाऱ्यांना आता एवढी आपुलकी का?” शिंदे गटातील खासदाराचा सवाल, म्हणाला “पोलिसांवर संशय…”

| Updated on: Sep 24, 2024 | 9:57 AM

एन्काऊंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणे हे दुर्दैव आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

अक्षय शिंदेला फाशी द्या म्हणणाऱ्यांना आता एवढी आपुलकी का? शिंदे गटातील खासदाराचा सवाल, म्हणाला पोलिसांवर संशय...
Follow us on

Badlapur Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर अक्षयच्या आई-वडिलांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार देत पोलिसांवर आरोप केले आहेत. आता यावरुन विरोधकांकडून राजकारण सुरु झाले आहे. याप्रकरणी आता शिंदे गटातील एका खासदाराने प्रतिक्रिया दिली आहे.

अक्षय शिंदेचा एनकाऊंटर झाल्यानतंर आता पोलिसांवर टीका होत आहे. हे सर्व षडयंत्र आहे. अक्षय शिंदचा ठरवून एन्काऊंटर करण्यात आला आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. आता यावर ठाण्यातील शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेश म्हस्के यांनी ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. एन्काऊंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणे हे दुर्दैव आहे, असे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

नरेश म्हस्के काय म्हणाले?

बदलापूर अत्याचारातल्या आरोपीने पोलिसाची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. तीन पोलिस त्यात जखमी आहे. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झालाय. परंतु, विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत सुटले आहेत. एन्काऊंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणे हे दुर्दैव आहे.

जखमी पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत विरोधकांना काही घेणं देणं नाही, पण अक्षय शिंदे मारला गेला याचं त्यांना दुःख होतंय. विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचं मनोबल कायम रहावं, त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावं, तसंच महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे हे दाखविण्यासाठी आम्ही ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पोलिसांची भेट घेतली.

आधी साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचे विरोधकांनी राजकारण केले. आता तो नराधम पोलिसांच्या चकमकीत मारला गेला तर त्यावरूनही राजकारण करताय. आता पोलिसांवर आरोप करणे ही दुटप्पीपणाची हद्द झाली आहे. या आरोपीला भरचौकात फाशी द्या अशी मागणी करणाऱ्यांना आता त्याच्याविषयी एवढी आपुलकी कशी वाढली ? असा सवाल नरेश म्हस्के यांनी विचारला आहे.

जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन

तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पत्नी शर्मिला ठाकरे हे देखील जखमी पोलिसांची भेट घेणार आहे. यावेळी त्या दोन्ही जखमी पोलिसांना ५१ हजार आणि ५१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचा पंचनामा झाल्यानतंर त्याचा मृतदेह मुंबईतील जे.जे. रुग्णालयात आणला जाणार आहे. जे. जे. रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन होईल. त्यानंतर त्याचे मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.