संजय भोईर, ठाणे : ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना मारहाणीचं प्रकरण अजून शमलेलं नाही तोच आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप खुलेआम सुरु असतानाच सोशल मीडियातूनही ठाकरे विरुद्ध शिंदे गटाचं युद्ध सुरु आहे. यातूनच आणखी एक धमकीचं प्रकरण उघडकीस आलं आहे. ठाकरे गटाच्या स्मिता आंग्रे यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टवरून त्यांनादेखील रश्मी शिंदे यांच्यासारखी धमकी आली. टीव्ही9च्या प्रतिनिधींशी त्यांनी सविस्तर खुलासा केला. स्मिता आंग्रे ही युवती सेनेची कार्यकर्ती असून कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाची शिवसेना अधिकारी आहे.
स्मिता आंग्रे यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्तीकडून त्यांना थेट धमकी आल्याचा आरोप केला आहे. नम्रता भोसले यांनी स्मिता आंग्रेला धमकी दिल्याचं तिने म्हटलंय. स्मिता आंग्रे म्हणाल्या, ‘ “ठाकरे गटाचे सदस्य अमित परब यांची एक पोस्ट होती. त्यावर मी ‘नम्रपणे विकास दरवळतोय…’ अशी कमेंट केली.
या कमेंटच्या १५ मिनिटानंतर मला नम्रता भोसले जाधव यांचा कॉल आला. रात्री ११ वाजता. तू ही काय कमेंट केलीस?…
मी म्हणाले, मी सोशल मीडियावर अनेक कमेंट करत असते. त्यानंतर त्यांनी मला अमित परबच्या पोस्टबद्दल सांगितलं..
त्या म्हणाल्या, ‘ नम्रता भोसले ही विकास ढेपाळेसोबत काम करते, हे तुला माहिती आहे… मी म्हणाले, ‘ तुम्ही का स्वतःवर ओढून घेताय. मी कुणाला काहीही टॅग केलेलं नाही. त्यावर त्यांनी शिवीगाळ केली. रोशनीसारखीच तुझी हालत करेन, तुझ्याकडे बघतेच, अशी धमकी त्यांनी दिली.’
रोशनी शिंदे यांच्यासारखी तुझी हालत करेन, अशी धमकी आल्यानंतर स्मिता आंग्रे यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अनेड अडचणी निर्माण केल्या, असा आरोप स्मिता यांनी केलाय. त्या म्हणाल्या, ‘ रात्री ११ वाजता धमकी आल्यानंतर मी सकाळी श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यांनी माझी तक्रार दाखल करून घेतली नाही. मी दिवसभर ऑफिसला असते. घरी माझे कुटुंबीय घरी असतात. त्यांच्या सुरक्षेसाठी मला तक्रार दाखल करायची होती. अखेर उपायुक्त कार्यालयात तक्रार नोंदवून घेतली…
या धमकीनंतर स्मिता आंग्रे यांनी मला भीती वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मी काहीही चुकीचं केलेलं नाही. किंवा त्यांच्या भावना दुखावतील, असं बोललेले नाही. त्यामुळे जनता माझ्या सोबत असेल, असं वक्तव्य स्मिता आंग्रे यांनी केलंय.
ठाण्यातील कासार वडवली परिसरात सोमवारी रात्री रोशनी शिंदे या ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यालाही सोशल मीडियातील कमेंटमुळेच मारहाण करण्यात आली, असा आरोप आहे. शिंदे गटातील महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना पोटात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. रोशनी शिंदे या सध्या लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत.