कल्याण: कल्याण-डोंबिवलीतील (kalyan-dombivali) 7 ते 8 नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीत (ncp) प्रवेश करणार आहे. मीही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे, असा दावा अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील (kunal patil) यांनी केला आहे. राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासमोरच पाटील यांनी हा दावा केला आहे. पाटील यांच्या दाव्यामुळे कोणत्या पक्षाचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागणार याबाबतची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. कल्याण-डोंबिवली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत इनकमिंग सुरू झालेली असतानाच आता राष्ट्रवादीतही आता इनकमिंग सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी काळात कल्याण-डोंबिवलीतील राजकीय हवा अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. कल्याणमध्ये आज राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह माजी खासदार आनंद परांजपे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, वंडार पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यकर्त्यांचा मेळावा आज दोन ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यकर्ता मेळाव्याला अपक्ष नगरसेवक कुणाल पाटीलही उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा दावा केला आहे. 2015 मध्ये अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर कुणाल पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र आज राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात कुणाल पाटील हे त्यांच्या समर्थकांसह उपस्थित राहिले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मी आणि माझ्यासोबत सात ते आठ नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे, असं त्यांनी यावेळी जाहीर केलं. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये कुणाचा प्रवेश होणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना जोरदार मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. लोकांनी काय पेहराव करावा यासाठी आता केंद्राने मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग या नावाने मंत्रालय सुरू करावे. म्हणजे त्यामुळे प्रश्न मिटतील, असा टोला आव्हाड यांनी भाजपला हिजाबवरुन सुरु असलेल्या वादावर टोला लगावला आहे.
इतकेच नाही तर केडीएमसी निवडणूकीत आम्ही आघाडी करायला तयार आहोत. मात्र त्यांच्या मनात काय सुरू आहे हे ओळखायला मी काही ज्योतिषी नाही, असा चिमटा शिवसेना नेत्यांना काढला. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागावे, असे निर्देशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
कल्याण-डोंबिवलीत अनेक वर्षापासून शिवसेना-भाजपची सत्ता होती. त्यामुळे आव्हाड यांना विकासाच्या मुद्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, कल्याण-डोंबिवलीत विकास हरवला आहे. तो फक्त विकास म्हात्रे यांच्या घरीच झाला आहे अशी टीका आव्हाड यांनी करताच एकच खसखस पिकली.
कल्याणमध्ये शेतकऱ्याला मारहाण झाल्याच्या प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं. शेतकऱ्याला मारहाण झाली. उशिराने गुन्हा दाखल झाला. हा आश्चर्याचा विषय झाला, असं ते म्हणाले. गणपती दर्शनासाठी माजी आमदार सुभाष भोईर यांच्या मी घरी गेलो होतो. त्याठिकाणी मनसे आमदार राजू पाटील आले होते. कडी लावून गुप्त चर्चा करत नाही, असंही ते म्हणाले.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 12 February 2022 pic.twitter.com/rXKVpyP2hd
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 12, 2022
संबंधित बातम्या:
Kalyan Crime : कल्याणमध्ये पुन्हा एकदा हत्यार तस्कराकडून गोळीबार, हत्यार विक्रीसाठी आला होता आरोपी