ठाणे : ठाणे शहरात मागील 24 तासात झालेल्या पावसाने 200 मिमीचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासात ठाणे, मुंब्रा, कळवा, दिवा परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरले असून, अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यादरम्यान दिवा खार्डी गाव येथे एक 16 वर्षीय मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. गेल्या 24 तासापासून अग्नीशमन दलाचे जवान मुलाचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप मुलाचा शोध लागला नाही. दरम्यान, पावसाने विश्रांती घेतल्यानंतरही परिसरातील पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष असून, महापालिकेच्या नाले सफाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
एमएस कंपाऊंड या ठिकाणी राहणारा 16 वर्षीय मुलगा काल दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास दुकानातून सामान आणण्यास स्कूटीवर गेला होता. मात्र परतेपर्यंत घरी येणाऱ्या मार्गावर कमरे एवढं पाणी साचले होते. मुलाने आपली स्कुटी रस्त्यावर पार करून कमरेएवढ्या पाण्यातून घरी येण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने तो वाहून गेला.
मुलाच्या घरच्यांना घटनेची माहिती मिळतात त्यांनी तात्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली. यानंतर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत, दिवा परिसरातील नाल्यात शोध सुरु केला. मात्र मुलगा सापडला नाही. गेल्या 24 तासापासून अग्निशामक दलाचे कर्मचारी दिवा परिसरातील मोठे नाले आणि जवळील दिवा खाडीत तरुणाचा शोध घेत आहेत.