डोंबिवली : डोंबिवलीत गाडी चोरी (Car Theft)चा एक अजब प्रकार पुढे आला आहे. बायकोला गावाहून आणण्यासाठी चालक हा मालकाची गाडी न सांगताच गावाला घेऊन गेला, पण तो परत आलाच नाही. याप्रकरणी मालकानं पोलिसात तक्रार केल्यानंतर विष्णुनगर पोलिसां (Vishnunagar Police)नी चार महिन्यांनी या भामट्या चालकाला अटक (Arrest) केली आहे. रतन उर्फ जितू मासरे (43) असं या भामट्या चालकाचं नाव आहे. त्याची बायको जळगाव जिल्ह्यातील त्याच्या गावी गेली होती. तिला आणण्यासाठी रतन हा जानेवारी महिन्यात मालकाला न सांगता त्याची बोलेरो गाडी घेऊन जळगावला गेला होता.
चालक रतन मासरे हा डोंबिवली पश्चिमेच्या रेतीबंदर मोठागाव येथून मालकाला न सांगताच त्याची गाडी घेऊन गेला. याबाबत मालकानं जानेवारी महिन्यातच विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यानंतर पोलिसांच्या तपासात संबंधित महिंद्रा बोलेरो गाडी जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगावमध्ये बेवारस स्थितीत आढळून आली. त्यामुळं पोलिसांनी तांत्रिकी तपास करत आरोपी चालक जितू मासरे याला चाळीसगावमधून अटक केली. एकीकडे बायको परत यायला तयार नव्हती आणि मालकाला न सांगता गाडी आणल्यानं मालक चिडेल या भीतीने जितू हा चार महिने जळगाव, चाळीसगाव आणि नाशिक परिसरात राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
टिटवाळा रेल्वे स्थानकातून एका वृद्ध दाम्पत्याचे दागिने चोरुन पसार झालेल्या चोरट्याला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने 18 दिवसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चोरी केल्यानंतर चोरटा 18 दिवसापासून गायब होता. पोलिस त्याचा बराच शोध घेत होते. अखेर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वासिंद येथून पोलिसाच्या मुसक्या आवळल्या.