उल्हासनगर / 1 सप्टेंबर 2023 : उल्हासनगर महापालिकेत बोगस लिपिकांचा सुळसुळाट आहे. बोगस कर्मचारी प्रकरणात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्यासह चौघांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बोगस लिपिक प्रकरणी प्रहार जनशक्ती आणि राष्ट्र कल्याण पार्टीने आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. वीस दिवसांपूर्वी एका लिपिकाला अटक झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. प्रहार जनशक्ती आणि राष्ट्र कल्याण पार्टीने रंगेहाथ बोगस लिपिकाला पकडले होते. यानंतर दोन्ही पक्ष आक्रमक झाले होते.
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील, राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी, महासचिव राहुल काटकर हे नगररचना विभागात 10 ऑगस्ट रोजी काही कामानिमित्त गेले होते. यावेळी जगन्नाथ जगताप हा लिपिकाच्या जागी बसून शासकीय दस्ताऐवज हाताळताना आढळून आला. यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता नगररचानकार प्रकाश मुळे यांनी आपल्याला कामावर ठेवल्याचे त्याने सांगितले.
यानंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्याशी संपर्क साधून प्रहार जनशक्ती आणि राष्ट्र कल्याण पार्टीने जगन्नाथ जगताप याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र या घटनेला 20 दिवस झाले तरी महापालिकेने बोगस लिपिक आणि नगररचनाकार मुळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला नव्हता. अखेर गुरुवारपासून प्रहार जनशक्ती आणि राष्ट्र कल्याण पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरु केले होते. यानंतर महापालिकेच्या वतीने अखेर नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
जगन्नाथ जगताप याच्यासह स्वाती कदम, दीपक कुऱ्हाडे आणि राहुल जोते हे उल्हासनगर महापालिकेच्या नगररचनाकार विभागात अवैधरित्या काम करताना आढळून आले होते. आयुक्त किंवा उल्हासनगर महापालिका तक्रार करीत नाही, तोपर्यंत आम्हाला गुन्हा दाखल करता येणार नाही, असे पोलिसांनी आंदोलनकर्त्याना सांगितले. आंदोलनकर्त्यांच्या दबावामुळे पालिकेचे मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी याप्रकरणी चौकशी करत पालिका आयुक्त अजिज शेख यांना अहवाल सादर केला.
या अहवालावर अजिज शेख यांनी दोन दिवसापूर्वी मध्यवर्ती पोलीस ठाण्याला तक्रार अर्ज देण्याबाबत आदेशित केले. या आशयाचे पत्र आंदोलनकर्त्यांना देत आंदोलन मागे घेण्याची विनंती पालिका प्रशासनाकडून करण्यात आली. उल्हासनगर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त मनिष हिवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्यासह जगन्नाथ जगताप, स्वाती कदम, दीपक कुऱ्हाडे आणि राहुल जोते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.