ठाणे : तुमची मुलगी माझ्या मुलीप्रमाणे आहे, ती माझीच मुलगी आहे, तिची सर्व जबाबदारी माझी आहे, मला कधी प्रेम मिळाले नाही, फक्त तुम्हीच माझे आयुष्य आहात, अशा भावनिक कहाणीचा वापर करून मॅट्रिमोनिअल साईट्सवर प्रेमाचे संबंध प्रस्थापित करत जवळपास 41 महिलांची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेसह त्याच्या साथीदाराला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे या सर्व महिलांबरोबर या नराधमाने बलात्कार केल्याची शक्यताही ठाणे पोलिसांनी वर्तवली आहे. याच लखोबाने जवळपास साडेतीन कोटी रुपयाचा गंडा या महिलांना घातलाय. त्यामुळे तुम्ही जर अशा मॅट्रिमोनिअल साईट्सवर कोणाशी मैत्री करणार असाल तर सावधान… तो असा लखोबा लोखंडे असू शकतो.
हल्लीच्या धकाधकीच्या काळात समाजामध्ये वावरण्याचे प्रमाण कमी झाल्याने अनेकांना लग्नासाठी आपल्या पसंतीची मुलगी किंवा मुलगा शोधणे कठीण झाले आहे. याचाच फायदा घेत अनेक मॅट्रिमोनियल साईट्सचा सुळसुळाट झाला आहे. लग्नाचे स्वप्न पाहणारे अनेकजण मॅट्रिमोनिअल साईट्सवर नावे नोंदवून आपला जीवनसाथी शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु याचाच फायदा घेत अनेक तोतया आपले उखळ पांढरे करून घेतात. विधवा आणि घटस्फोटीत महिलांना विशेष करून टार्गेट केले जात आहे. अशाच साईटवर भावनिक कहाणी सांगून महिलांशी मैत्री करून नंतर त्याचे रूपांतर प्रेमसंबंधात करत लग्नाचे आमिष देत शाररिक संबंध प्रस्थापित करून , तर त्याही पुढे काही कारण पुढे करत याच महिलांकडून पैसेही उकळणाऱ्या प्रजित जोगीश केजे या लखोबा लोखंडेसह त्याचा मित्र श्रीनिवासला ठाणे पोलिसांनी जेरबंद केलंय.
पुदुच्चेरी येथे राहणारा 44 वर्षीय प्रजित जोगीश केजे याने अशाच प्रकारे आपले जाळे पसरवत अनेक राज्यातील तब्बल 41 महिलांची साडेतीन कोटी रुपयांची फसणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई, केरळ, बंगळुरू, कोलकाता सारख्या अनेक शहरात त्याने मॅट्रिमोनिअल साईट्सवर नावे नोंदविलेल्या 41 महिलांना गंडा घातलाय. ठाण्यातील एका महिलेला देखील त्याने असेच आमिष दाखवत शारीरिक शोषण केले व त्यांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सचा वापर करून महागड्या वस्तू देखील विकत घेतल्या. आपले पॅरिस येथे हॉटेल होते व त्याच्या विक्रीतून आलेले पैसे RBI मध्ये अडकल्याने ते सोडविण्यासाठी पैसे मागितले. त्या बदल्यात दुप्पट व्याज देण्याचे अनेकांना आमिष देत या तोतयाने गंडा घातलाय. तर अशा आणखी काही महिला असतील तर त्यांनी पोलिसांसमोर यावे व तक्रार करावी असे आव्हान पोलिसांनी यावेळी केले आहे. (Accused arrested for cheating 41 women at matrimonial sites)
इतर बातम्या