पावसाचा हाहा:कार, अंबरनाथमध्ये उद्यानाची भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना, दोघांचा मृत्यू

| Updated on: Oct 06, 2021 | 11:19 PM

कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर शहरात बुधवारी (6 ऑक्टोबर) संध्याकाळी वादळी वाऱ्यासह प्रचंड मुसळधार पाऊस पडला. यावेळी अनेक ठिकाणी होर्डिंग्ज पडण्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

पावसाचा हाहा:कार, अंबरनाथमध्ये उद्यानाची भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना, दोघांचा मृत्यू
अंबरनाथमध्ये उद्यानाची भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना, दोघांचा मृत्यू
Follow us on

अंबरनाथ (ठाणे) : कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर शहरात बुधवारी (6 ऑक्टोबर) संध्याकाळी वादळी वाऱ्यासह प्रचंड मुसळधार पाऊस पडला. यावेळी अनेक ठिकाणी होर्डिंग्ज पडण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तसेच काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. या भयावह पावसामुळे जे नुकसान झालंय त्याची भीषणता आता समोर येऊ लागली आहे. अंबरनाथ शहरात महालक्ष्मी नगर गॅस गोडाऊन परिसरात पावसामुळे प्रचंड विपरीत घटना घडली आहे. या परिसरात उद्यानाची भिंत कोसळल्याने भिंतीखाली दबून दोघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

दुर्घटनेत 5 ते 6 घरांचं मोठं नुकसान

संबंधित घटना ही महालक्ष्मी गॅस गोडाऊन परिसरातील उद्यानाजवळ घडली. या दुर्घटनेत 5 ते 6 घरांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच भिंतीखाली काहीजण अडकल्याची माहिती समोर आली होती. या घटनेची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढलं. यावेळी दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं.

नेमकं काय घडलं?

अंबरनाथ शहरात आज सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अंबरनाथ पूर्वेतील गॅस गोडाऊन परिसरात असलेल्या उद्यानाच्या संरक्षक भिंतीखालची माती खचली आणि भिंत बाजूलाच असलेल्या बैठ्या घरांवर ही संपूर्ण भिंत कोसळली. या घटनेत पाच ते सहा घरांचं मोठं नुकसान झालं. तसंच काही गाड्या देखील भिंतीखाली दबल्याने गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भिंतीचे अवशेष बाजूला करत असतानाच या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण दबले असल्याचं समोर आलं. या दोघांनाही बाहेर काढून तपासलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

या घटनेनंतर अंबरनाथ नगरपालिका प्रशासन, अग्निशमन दल, यांच्यासह नायब तहसीलदार यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली. या भिंतीचे ढिगारे उचलण्याचं काम अंबरनाथ नगरपालिकेकडून तातडीने हाती घेण्यात आलं आहे. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली असून ज्या घरांचं नुकसान झालं आहे, त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहे.

कल्याणमध्ये दोन झाडं कोसळली

दुसरीकडे, कल्याणमध्ये जोरदार वाऱ्यामुळे द्वारली गावात दोन झाडे कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका रिक्षासह घराचे नुकसान झालं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झाड हटविण्याचे काम सुरु केले.

मुसळधार पावसामुळे बेळगावात घर कोसळून पाच जणांचा मृत्यू

बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावात मुसळधार पावसामुळे घर कोसळून पाच जण ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून मदतकार्य सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून सातत्याने पावसाचा जोर सुरु आहे. दरम्यान संबंधित दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये पावसाचा हाहा:कार

नाशिकच्या देवळा भागातही पावसाचा हाहा:कार बघायला मिळाला. पावसामुळे अनेक झाडं जमीनदोस्त झाली. तर काही ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह होत असलेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पुण्याच्या दौंड शहरात घरावर वीज कोसळली

पुण्याच्या दौंड शहरातही प्रचंड मुसळधार पाऊस पडला. यावेळी एका घरावर वीज कोसळल्याची घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही बालाजी नगर परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे घरावर वीज कोसळल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

हेही वाचा : 

Maharashtra Cabinet Decision : लखीमपूर खेरी घटनेसंदर्भात ठाकरे मंत्रिमंडळाकडून खेद व्यक्त

दोन सख्खे भाऊ आजीच्या डोळ्यादेखत नदीत वाहून गेली, तिसऱ्याचा अद्याप तपास नाही, औरंगाबादेतील हृदयद्रावक घटना