बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला. बदलापूर पोलीस ठाण्यात मयत आरोपी अक्षय शिंदे यांच्या कुटुंबाने दफनासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. आरोपीच्या आई-वडिलांसह त्याचा भाऊही बदलापूर पोलीस ठाण्यात काल रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास आला. त्यांनी अक्षय शिंदे याला दफन करण्यासाठी जागा लवकरात लवकर शोधून द्यावा, असा अर्ज दिला आहे. अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरे यांनी यावर भाष्य केलं आहे. तसंच अक्षय शिंदेच्या कुटुंबियांना आणि वकिलांना संरक्षण मिळावं, अशीही मागणी करण्यात आली आहे.
अक्षय शिंदे याचे वकील अमित कटारनवरे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. दफनभूमी साठी जागा मिळत नाही याबाबत न्यायालयात सांगितलं. मात्र काल तसं काही घडलं नाही. अक्षय शिंदे यांच्या कुटुंबियांना आज दफनभूमीची जागा बघण्यासाठी पोलिसांनी बदलापूरला बोलावलं आहे. दोन तीन जागांची पाहणी करणार आहेत, असं अमित कटारनवरे यांनी म्हटलं आहे.
किरीट सोमय्यांना संरक्षण दिलं जात तर मग अक्षय शिंदे यांच्या कुटुंबीयांना देखील संरक्षण देण्यात यावं. त्यांच्यावर मला सुद्धा सोशल मीडियावर अनेक कमेंट येतायत त्यामुळे माझ्या जीविताला धोका आहे. म्हणून मला देखील संरक्षण मिळावं अशी मागणी शिंदे यांच्या कुटुंबाने केली. हे प्रकरण सरकारचे स्पॉन्सर आहे ,त्याचा रोल आहे की नाही हे कुणालाच माहिती नाही. शाळेचे मुख्य आरोपी फरार आहेत, असं अमित कटारनवरे म्हणाले.
दफनभूमीसाठी पोलिसांचा फोन आला होता. आम्ही जागा बघायला जातोय. अक्षय शिंदे याच्या कुटुंबियांसह त्याचे वकील आणि त्याच्या कुटुंबीयाना संरक्षण मिळावे अशी मागणी केली, असं अक्षय शिंदे यांचे नातेवाईक अमर शिंदेने म्हटलं आहे. त्यामुळे आता अक्षय शिंदेच्या कुटुंबाला आणि वकिलांना संरक्षण मिळणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.