कल्याण : विविध स्कीमचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन आणखी एक ज्वेलर्स (Jewelers) पसार झाल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. एस. कुमार या ज्वेलर्स शोरुमचा मालक ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Fraud) करुन फरार झाला आहे. श्रीकुमार पिल्लई असे फरार झालेल्या ज्वेलर्स शोरुम मालकाचे नाव आहे. त्यामुळे पैसे गुंतविणारे ग्राहक हवालदिल झाले आहेत. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. देशभरात एस. कुमार ज्वेलर्सचे 13 शोरुम असल्याची माहिती समोर आली आहे. (Another jeweler absconding after taking crores of rupees from investors in Kalyan)
अनेक ज्वेलर्स विविध सोनेरी स्कीमच्या नावाखाली लोकांकडून त्यांच्या दुकानात पैसे गुंतवणूक करुन घेतात. मात्र पैसे जमा झाले की, फरार होतात. फसवणूक मात्र सामान्य नागरिकांची होते. हे पण खरे आहे की, फसवणुकीचे इतके प्रकार समोर येत असताना लोक विविध योजना भुलून जास्त पैसे मिळतील या नादात गुंतवणूक करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या लबाडांना संधी मिळते. असाच एक लबाड ज्वेलर्स कल्याणमध्ये पसार झाला आहे.
कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकात एस. कुमार गोल्ड अॅण्ड डायमंड नावाचे शोरुम आहे. काही वर्षापूर्वी या शोरुमचे उद्घाटन थाटामाटात करण्यात आले होते. अॅक्टर्स आणि नेते मंडळीनी या उद्घाटनाला हजेरी लावली होती. या शोरुमचा खूप गाजावाजा करण्यात आला. ज्वेलर्सच्या मार्फत जास्त फायदा करुन देण्याच्या नावाखाली विविध गोल्ड स्कीम सुरु करण्यात आल्या. त्यात नागरिकांनी पैसा गुंतविला आणि आता हे शोरुम बंद झाले आहे. शोरुम बंद करुन शोरुमचा मालक श्रीकुमार पिल्लई हा पसार झाला आहे. या शोरुम चालकाकडून फसविले गेलेले 25 ग्राहक आतापर्यंत समोर आले आहेत. ज्यांच्याकडून शोरुम मालकाने एक कोटी 56 लाख घेतले होते. आणखीन मोठ्या प्रमाणात ग्राहक समोर येऊ शकतात. ज्यांची फसवणूक शोरुम मालकाने केली आहे. याप्रकरणी अधिक तपास महात्मा फुले पोलिस करीत आहेत. (Another jeweler absconding after taking crores of rupees from investors in Kalyan)
इतर बातम्या
मुलुंड भागात गोळीबाराच्या घटनेनं खळबळ! अमर नगर परिसरातली घटना, पोलिस आणि आरोपीमध्ये झटापट