अंबरनाथ : अंबरनाथमध्ये MMRDA आणि अन्य शासकीय यंत्रणांच्या नियोजनशून्य कारभाराचा मोठा फटका कल्याण कर्जत राज्य महामार्ग या प्रमुख रस्त्याला बसला आहे. कारण हा रस्ता तयार करताना रस्त्याखाली येणाऱ्या जलवाहिन्या स्थलांतरित न केल्यानं आता जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता तोडण्याची वेळ आलीये.
अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्ग या प्रमुख रस्त्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अंबरनाथ आणि उल्हासनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या या रस्त्याच्या बाजूने गेल्या होत्या. मात्र रस्त्याचं काँक्रीटीकरण करताना रुंदीकरण सुद्धा करण्यात आल्यानं या जलवाहिन्या रस्त्याच्या जागेत आल्या. त्यामुळं रस्ता बांधताना त्या बाजूला स्थलांतरित करणं गरजेचं होतं. मात्र तसं न करता MMRDA नं थेट जलवाहिनीवरच सिमेंटचा रस्ता तयार केला. त्यावेळी भविष्यात जलवाहिनीची दुरुस्ती करायची झाल्यास रस्ता तोडावा लागेल, अशी भीती व्यक्त झाली. पण त्याकडे दुर्लक्ष करत जलवाहिनी अक्षरशः रस्त्याखाली गाडून टाकण्यात आली.
मात्र त्यावेळी केलेलं दुर्लक्ष हे आता मात्र महागात पडलंय. कारण ही जलवाहिनी खराब झाल्यानं तिच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता तोडण्याची वेळ आलीये. अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या समोर हा रस्ता खोदण्यात आला असून त्यानंतरच जलवाहिनीची दुरुस्ती करणं शक्य झालंय. धक्कादायक बाब म्हणजे रस्त्याचा जो पॅच आत्ता खोदण्यात आलाय, तो अवघ्या ६ महिन्यांपूर्वीच बांधण्यात आला होता. मात्र त्या रस्त्याखालच्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्ह बिघडल्यानं तो दुरुस्त करण्यासाठी हा रस्ता खोदण्यात आला. त्यामुळं MMRDA नं केलेला खर्च पाण्यात गेलाय.
दरम्यान, याबाबत MMRDA च्या अभियंत्या सिद्धेश्वरी टेम्भुर्णीकर यांना विचारलं असता, ज्यावेळी हा रस्ता बांधण्यात आला, त्यावेळी संबंधित विभागांना या पाईपलाईन बाजूला शिफ्ट करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता, मात्र कामाच्या खर्चामुळे कोणत्याही विभागाने त्यावेळी या कामात स्वारस्य दाखवलं नाही, त्यामुळे आम्ही या पाईपलाईनला ब्रॅकेट टाकून मग वर रस्ता बांधल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
तसंच आता ज्या विभागाने हा रस्ता तोडला असेल, त्यांनीच तो स्वखर्चाने पुन्हा बांधून द्यावा, यासाठी आपण पत्र पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शासकीय विभागांच्या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्यांना मात्र नाहक त्रास सोसावा लागतोय.
हे ही वाचा :
सुप्रिया सुळेंच्या स्वागतासाठी उभ्या गर्दीत मालवाहू वाहन घुसले, तिघे गंभीर जखमी
दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, एक असा मुद्दा ज्यावरुन अमित शहा उद्धव ठाकरेंवर खूश होणार, शाबासकी देणार?