ठाणे : देशात पुढच्या वर्षी लोकसभा आणि त्यानंतर राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्ष देखील कामाला लागला आहे. एमआयएमचा आज पहिल्यांदाचा महाराष्ट्रात मेळावा पार पडला. त्यानंतर आज संध्याकाळी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी मुस्लिम समुदायाला भावनिक आवाहन केलं. महाराष्ट्रात मुस्लिम समुदायाचा व्यक्ती का नेता होऊ शकत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याशिवाय मुंब्र्यात आगामी काळात एमआयएमचा आमदार होईल, असा दावा त्यांनी केला.
“मी मुंब्र्यामध्ये उभा राहून सर्व स्वतंत्र्यातील लोकांना सलाम करतो. अब्दुल वाहिद माझे आजोबा त्यावेळी उभे राहिले. कमी लोक मागे होते. पुढे जाऊन लढाई लढली आणि झुकले नाही. 65 वर्षांपूर्वी आपल्या लोकांनी मेहनत आणि कुर्बानी दिली नसती तर मी इथे नसतो. ही लढाई आम्ही तुम्ही लढत आहोत. आपली लढाई एकच समाजासाठी”, असं असदुद्दीन औवेसी म्हणाले.
“माझ्यासोबत तुम्ही साथ दिली. माझ्यासारखा एक भाऊ अकबर ओवैसी मला दिला. मी माझ्या सर्व भावंडांचे आभार मानतो ज्यांनी त्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं. औरंगाबादमध्ये शिवसेनेचा खासदार हरवून इम्तियाज जलीलला निवडून दिले. महाराष्ट्र्चा आभारी आहे”, असं ते म्हणाले.
“मी तुमच्यामुळे पार्लमेंटमध्ये उभा आहे. तुमचा आवाज मी पार्लमेंटमध्ये घेऊन जातो. कधीपर्यंत तुम्ही गुलाम राहणार? महाराष्ट्र्रमधील मुस्लिम लोक नेते का बनू शकत नाही? अजित पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे नेता बनू शकतात तर शरद पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे सारखे मुख्यमंत्री बनू शकतात. मग मुस्लिम का नेता नाही होऊ शकत?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“शिवसेनेचे दोन तुकडे झाले, असं मला माध्यम विचारत आहेत. शिवसेना सेक्युलर आहे का? राहुल गांधी ओरडून सांगतील का शिवसेना सेक्यूलर आहे असं? शिंदे आणि उद्धव हे राम आणि शामची जोडी आहे. पुण्यात शरद पवार म्हणतात मुसलमानांनी मतं द्या. का मतदान करा? कारण मोदींना हरवायचं आहे. आज पुण्यात निवडणूक आहे. मी शरद पवार यांना विचारतो, विशाळगडवर तोफ मस्जिदकडे करून उडवली त्यावर बोला शरद पवार. माजी मंत्री नवाब मलिकांना जेल आणि अनिल देशमुख बाहेर”, असं ओवैसी म्हणाले.
“नरेंद्र मोदींच्या राज्यात जुनैद आणि नासीरची हत्या होते. औरंगाबादचं नाव बदललं तेव्हा शरद पवार का बोलले नाही? काँग्रेस का नाही बोलली? मुस्लिम आरक्षणाबाबत बोला. महाराष्ट्रात कमी शिकलेले मुस्लिम आहेत. मुंब्र्याचे आमदाराला सांगतो. बेईमान कफन चोर आता निवडून येणार नाही. एका वाघाला आम्ही तिकीट देणार”, असंही ते म्हणाले.
“उद्धव ठाकरेंची गुलामगिरी करणाऱ्यांनो, शरद पवार, काँग्रेसवाले मुस्लिमांना का आरक्षण दिलं नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. मोदीजी पाचव्या वेळेस दगड फेकत असतील तर आधी सांगा मी येतो. आमच्या देखत दगड मारा. कोणाचा काच तुटणार बघू. तुमच्या गोळ्या काहीही करू शकले नाही. आपला नेता तयार करा. मुंब्र्यात आमदार तयार राहा. बेईमान लोकांना तिकीट मिळणार नाही. आता इमानदार आला आहे. एका वाघाला आम्ही तिकीट देणार”, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिलं.