आंदोलकांवर कारवाई पण संस्थाचालक मोकाट!; बदलापूर अत्याचार प्रकरणात काय घडतंय?

| Updated on: Sep 03, 2024 | 11:44 AM

Badlapur School Case Update : बदलापूरमधील बाल अत्याचाराच्या प्रकरणात अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील शाळेतच्या संस्था चालकांबाबत कुचराई झाल्याचं दिसतंय. सहा दिवसांनंतरही अटक झालेली नाही. या प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. वाचा सविस्तर...

आंदोलकांवर कारवाई पण संस्थाचालक मोकाट!; बदलापूर अत्याचार प्रकरणात काय घडतंय?
बदलापूर अत्याचार प्रकरण
Follow us on

बदलापुरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ अख्खं बदलापूर रस्त्यावर उतरलं होतं. यावेळी नागरिकांनी घडल्या प्रकारावर संताप व्यक्त केला होता. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, तसंच सदर शाळेवर कारवाई व्हावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली होती. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कल्याण सत्र न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले. शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे, आणि मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांच्या गुन्हा दाखल होऊन सहा दिवस उलटून गेले. तरीही अद्याप या तिघांपैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

आंदोलकांवर कारवाई पण संस्थाचालक मोकाट!

चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर संतापाची लाट उसळली होती. नागरिकांनी रस्त्यावर उतरत निषेध केला होता. बदलापूर स्टेशनवर नागरिकांनी जवळपास 11 तास रेल रोको केला. यावेळी आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. काही आंदोलकांवर गुन्हे देखील दाखल झाले. पण शाळेच्या संस्था चालकांवर मात्र कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे बदलापूर इथल्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून अनेकांना अटक केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात संस्थाचालकांविरोधात कारवाई होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.

105 जणांना जामीन

बदलापूरमधील आंदोलनातील 105 जणांना जामीन मंजूर झाला आहे. रेल रोको आणि पोलिसांवर दगड फेक करणाऱ्या 58 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तर शाळेची तोडफोड करणाच्या आरोपात असलेले 47 जणांना कल्याण सत्र न्यायाल्याने जमीन अर्ज मंजूर केला. या आंदोलकांची जामिनावर सुटका झाली आहे. तर या प्रकरणी आंदोलनकर्त्यांची केस वकील संघटनांनी मोफत लढवली. त्यामुळे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.

बदलापूर प्रकरणावर आज सुनावणी

बदलापूरमधील लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. स्वतःहून दखल घेतलेल्या सुमोटो याचिकेवर मागच्या 27 ऑगस्ट उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. केवळ मुलींना शिकवण देऊन त्यांच्यावर निर्बंध लादण्याऐवजी मुलांना चांगलं वागण्याची शिकवण देण्याची गरज असल्याचं यावेळी न्यायालयानं म्हटलं होतं. मात्र आज या प्रकरणी पुन्हा होणार सुनावणी आहे. सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.