मोठी बातमी | चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराविरोधात मंगळवारी बदलापूर शहर बंद

| Updated on: Aug 20, 2024 | 1:02 PM

बदलापूरमधील एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे याबाबतची तक्रार देण्यासाठी या मुलींचे कुटुंबीय बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं. त्यामुळे पोलिसांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होतोय.

मोठी बातमी | चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराविरोधात मंगळवारी बदलापूर शहर बंद
Follow us on

बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतीलच एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला.12 आणि 13ऑगस्ट रोजी ही घटना घडली. यानंतर पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नसल्याने तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं. याचप्रमाणे आणखी एका मुलीसोबतही सारखाच प्रकार घडल्याची माहिती ही समोर आली.

या दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांचा एफआयआर नोंदवून घेण्यात आला नाही. अखेर मनसेने या प्रकरणात हस्तक्षेप करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधताच एफआयआर नोंदवून घेण्यात आला. त्यामुळे पोलिसांच्याही कारभारावर संताप व्यक्त होतोय. ज्या शाळेत हा प्रकार घडला, ती शाळा बदलापूरमधील अतिशय जुनी, नामांकित आणि सर्वात मोठी शाळा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे बदलापूर शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जातेय.

चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराचा घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या बदलापूर बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत बदलापूरकरांना हे आवाहन करण्यात आलं असून या बंदला व्यापारी संघटना, स्कूलबस संघटना आणि रिक्षा संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. सकाळी 6.30 वाजता आदर्श शाळेवर शांततेत नागरिकांचा मोर्चा निघणार आहे.

शाळा प्रशासनाने बदलापूरकरांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात येणार असल्याचं बदलापूरच्या मनसे शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रियांका दामले यांनी सांगितलं आहे. त्यानंतर संपूर्ण दिवस बदलापूर शहर बंद ठेवण्याचं आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केलं आहे. या बंदमधून मेडिकल आणि दूध सेवा मात्र वगळण्यात आली असून बाकी सर्व आस्थापना बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय.