दोन शाळकरी मुलींवर बदलापूरमध्ये लैंगिक अत्याचार झाला. हा अत्याचार करणारा दुसरा तिसरा कुणी नसून शाळेतील सफाई कामगार होता. या नराधमाने दोन चिमुकड्या जीवांवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना उघडकीस येताच बदलापूरच्या रस्त्यांवर जनआक्रोश पाहायला मिळाला. हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी आंदोलन केलं. या दोन चिमुकल्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. अन्याय करणाऱ्या या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली गेली. मात्र या आंदोलनकर्त्यांवरच आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दीड हजारहून अधिक लोकांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बदलापूर आंदोलन प्रकरणातील आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमाव जमवणे, रेल रोको करणे, स्टेशन परिसरात तोडफोड करणे, पोलिसांवर दगडफेक करणे या कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात 300 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आंदोलन दरम्यान शाळेची तोडफोड, बस आणि इतर गाड्यांची तोडफोडसह बदलापूर शहरात देखील दीड हजार पेक्षा अधिक आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
सध्या या प्रकरणात 28 पेक्षा अधिक आंदोलन करताना ताब्यात घेत रात्री उशिरा कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे. आज दुपारी या 28 आंदोलन करताना कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात हजर करणार आहेत. यानंतर न्यायालय त्यांना पोलीस कोठडी सुनावते का न्यायालयीन कोठडी याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
लहान मुलींवर अन्याय करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, या मागणीसाठी बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. ठिकठिकाणी आंदोलनं झाली. बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलकांनी रेलरोको केला. हे आंदोलन 11 तास सुरु होतं. यावेळी चिमुकल्यांच्या न्यायाची मागणी करण्यात येत होती. यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आंदोलकांनी त्यांच्या मागण्या त्यांच्या पुढे मांडल्या. या मागण्यांकडे सरकार गांभिर्यपूर्वक बघत आहे. दोघी मुलींना न्याय देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं. शिवाय आंदोलन मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र हा जमाव आंदोलन मागे घेण्यासाठी तयार नव्हता. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल केला.