बदलापूरमध्ये शाळेत चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर लावलेली सर्व कलमे जामीनपात्र असल्याचे स्पष्ट करत जिल्हा न्यायाधीश पी. पी. मुळे यांनी या दोन्ही आरोपींची वैयक्तिक २५ हजाराच्या जामिनावर सुटका केली. कालच सुनावणी दरम्यान न्यायालयाने त्यांच्या जामिनावर शिक्कामोर्तब केले होते. बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुरड्या विद्यार्थीनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला पोलीस चकमकीत गोळ्या घालण्यात आल्या असल्या तरी विरोधकांनी आजही हे प्रकरण ताणून धरले आहे.
या प्रकरणात ठपका ठेवलेल्या संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून त्यांना अटक करण्यात आली होती. या दोघांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर दोन गुन्हे वेगवेगळे दाखल असल्याने ते वेगवेगळे चालविण्याची मागणी सरकारी वकिलाकडून करण्यात आली होती. यामुळे काल या दोघांनाही पहिल्या प्रकरणात न्यायालयाकडून तात्काळ जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर आज पोलिसांनी त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले.
यावेळी आरोपी अक्षय शिंदे हा शाळेच्या रेकॉर्डवर कर्मचारी होता का? याबाबतची माहिती गोळा करायची असल्याने या आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी केली होती. मात्र याप्रकरणी यापूर्वीच सुनावणी झाली असून या प्रकरणातील संपूर्ण चार्जशीट पोलिसांनी न्यायालयात दाखल केली आहे. संस्थेकडून सर्व प्रकारचे तपासात सहकार्य केले जात असून या दोघांवर भारतीय दंडविधान कायद्यान्वये लादण्यात आलेली कलमे जामीनपात्र असल्याने या दोघांचीही जामिनावर सुटका केली जात असल्याचे न्यायमूर्ती मुळे यांनी स्पष्ट केले.
तसेच तातडीने वैयक्तिक जामिनासाठीची रक्कम न्यायालयात भरून घेत त्यांना सोडून देण्याचे निर्देश न्यायलयाने दिले. या सुनावणीसाठी न्यायालयातील अनेक वकील तसेच आजूबाजूचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही आरोपींची जामिनावर सुटका होताच संस्थेच्या इतर ट्रस्टी आणि नातेवाईकांनी या दोघांनाही कोर्ट रूममध्येच मिठी मारून आनंद साजरा केला.