ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात सध्या बॅनरबाजीचे पेव फुटले आहे. शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आणि शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी असं चित्र सध्या ठाण्यात पाहायला मिळत आहे. या तिन्ही पक्षांकडून एकमेकांच्याविरोधात बॅनरबाजी सुरू केली आहे. आता या बॅनरबाजीत ठाण्यातील दक्ष नागरिकही उतरले आहेत. एका नागरिकाने आनंद दिघे यांचं वाक्यच बॅनर्सवर लिहून ते बॅनर्स लावलं. पण या बॅनर्सवरील वाक्य वर्मी लागल्याने ते रातोरात उतरवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
कळव्यातील दक्ष नागरिक रवींद्र पोखरकर यांनी कवितेमधून ‘गद्दारांना क्षमा नाही’ हा आनंद दिघे यांनी दिलेला संदेश बॅनरच्या माध्यमातून लावला होता. अचानक लागलेल्या या बॅनर्सची जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, त्यानंतर हे बॅनर्स रातोरात उतरवण्यात आले. आनंद दिघे यांचं हे वाक्य वर्मी लागल्यानेच बॅनर्स रातोरात खाली उतरवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
म्हणताच खोका-बोका
चुकला काहींच्या हृदयाचा ठोका
पसरली एकदम अस्वस्थता
कारण, कळून चुकलxय
घालवून बसलोय लोकांची आस्था…
एक काय लावला गळाला
त्यांना वाटले हात लागले आभाळाला
JA म्हणतच नाही त्याने केला विकास
आम्हीच म्हणतो कळवा होते भकास
त्याच्यामुळेच झाले झकास
दिघेसाहेबच सांगून गेले गद्दारांना क्षमा नाही
ठाणे-कळवेकर हे विसरणार नाही…
दरम्यान, ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून बॅनर्स वॉर सुरू आहे. ठाण्यातील कळवा परिसरात कळवेकारांकडून बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. 29 जानेवारी रोजी लावण्यात आलेल्या या खोकेबोके बॅनरला प्रतिउत्तर देण्यात आले आहे.
लबाड लांडगा ढोंग करतो अशा आशयाचं बॅनर कळवेकारांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे गट यांच्यामध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
कळव्यातील समाजसेवक रवींद्र पोखरकर यांनी लावलेल्या या बॅनरला कळव्यातील नागरिक नरेंद्र शिंदे यांनी लबाड बोका ढोंग करतंय अशा आशयाचे लावले बॅनर लावून उत्तर दिलं आहे. नगरसेवक का सोडून चालले याचे आत्मपरीक्षण करा असा बॅनरवर मजकूर लिहिण्यात आला आहे.
‘तेल गेलं, तूप गेलं.. आता धुपाटनही राहणार नाही’ असा मजकूरही बॅनरवर लिहिण्यात आला आहे. ठाण्यात शिंदे विरुद्ध आव्हाड असा बॅनर वॉर पहायला मिळत आहे. आगामी निवणुका पाहता कळवा-मुंब्र्यातील सत्ता मिळवण्यासाठी बॅनर वॉर सुरु असल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे.