ठाणे/ नवी मुंबई : एप्रिल आणि मे महिन्यात कमी झालेला कोरोना (Corona) रुग्णांचा आलेख आता पुन्हा विजेच्या वेगाने वाढू लागला आहे. ठाणे (Thane) जिल्ह्यात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आता तीन अंकी झाली आहे. आज जिल्ह्यात 849 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे दैनंदिन उपचार घेणाऱ्या रुग्णांचा अकडा पाच हजारांच्या आसपास पोहोचला आहे. ठाणे महापालिका आणि नवी मुंबई (Navi Mumbai) महापालिका हद्दीत गेल्या 19 दिवसांत सुमारे सात हजार पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. रुग्ण वाढू लागल्यामुळे नियम पाळा आणि मास्क लावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात 849 नव्या रुग्णांनी नोंद झाल्याने एकूण रुग्ण संख्या ही सात लाख 19 हजार 733 इतकी झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजार 929 इतकी झाली आहे. आतापर्यंत मुक्त रुग्णांची संख्या ही सात लाख एक हजार 386 इतकी झाली आहे. जिल्ह्यात रविवारी सर्वाधिक 342 रुग्ण हे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात नोंदवले गेले आहेत. त्यापाठोपाठ नवी मुंबईत 313, कल्याण-डोंबिवली 87, उल्हासनगर 7, भिवंडीत 2, मीरा- भाईंदर 67, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर 7 आणि ठाणे 24 कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर जिल्ह्यात रविवारी कोणीही दगावला नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनानेदिली.
नवी मुंबई शहरात एप्रिल आणि मेमध्ये कोरोना रुग्णांचा आलेख कमी झाला होता. एप्रिल महिन्यात दरदिवशी आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या दहाच्या आत आली होती. मे महिन्यामध्येही ही संख्या कमीच होती. मे महिन्यात फक्त 582 रुग्ण शहरात आढळून आले. मात्र जूनमध्ये रुग्णांच्या संख्येत विजेच्या वेगाने वाढ झाली. जून महिन्यातील आतापर्यंतची रुग्ण संख्या तीन हजार 643 इतकी झाली आहे. • ठाणे शहरातही एप्रिल आणि मेमध्ये रुग्णांची संख्या कमी होती. मात्र जून महिन्यात ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जूनमध्ये आतापर्यंत तीन हजार 563 रुग्ण आढळून आले आहेत.
जून महिन्यात संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नऊ हजार 490 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण संख्या ठाणे आणि नवी मुंबई शहरात आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात जूनमध्ये फक्त 829 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. रुग्ण संख्या वाढत चालली तरी मृत्यूचे प्रमाण कमी आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने केले आहे.