बदलापूर : सोसायटीतलं झाड छाटताना दुचाकीस्वाराच्या डोक्यात ते झाड पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याचा प्रकार बदलापूरमध्ये घडलाय. या दुचाकीस्वारावर सध्या मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे (Biker seriously injured after falling tree on head in Badlapur).
बदलापूर पश्चिमेच्या मानव पार्क सोसायटीत गुरुवारी झाड छाटण्याचं काम सुरू होतं. यावेळी तिथून राशिद मुल्ला हे त्यांच्या दुचाकीने अन्य एका सहकाऱ्यासोबत निघाले होते. यावेळी झाड राशिद मुल्ला यांच्या डोक्यात कोसळलं आणि मुल्ला हे गाडीवरून पडले. ही संपूर्ण घटना तिथल्याच एका रहिवाशाने मोबाईल कॅमेरात चित्रित केली (Biker seriously injured after falling tree on head in Badlapur).
सुरुवातीला हा प्रकार फारसा गंभीर वाटला नाही आणि राशीद यांना किरकोळ मार लागला असेल, असं समजून जवळच्याच एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे राशीद यांचा डोक्याचा सिटी स्कॅन केल्यानंतर त्यांच्या कवटीला तीन ते चार ठिकाणी फ्रॅक्चर झालं असून मेंदूलाही मार लागल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
राशीद यांच्यावर सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. या सगळ्या प्रकरणात बदलापूर पश्चिम पोलिसांनी मानव पार्क सोसायटीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशाप्रकारे निष्काळजीपणा आणि इतरांच्या जीविताला धोका उत्पन्न करणारं कृत्य करणाऱ्या या सोसायटीच्या विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी राशीद मुल्ला यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
दुचाकीस्वाराच्या डोक्यावर झाड कोसळलं, मेंदूला मार, कवटीला तीन ते चार ठिकाणी फ्रॅक्चर, बदलापूर येथील घटना #Badlapur #TreeFall pic.twitter.com/mvq44GrSkH
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 25, 2021