लसीकरणाच्या कूपन्स वाटपात काळाबाजार, भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा गंभीर आरोप

| Updated on: Aug 11, 2021 | 7:44 PM

कल्याणमध्ये एकीकडे लसीचा तुटवडा, तर दुसरीकडे नियोजनाचा अभाव असल्याचं दिसतंय. आठ आठ तास रांगेत उभे राहून देखील लोकांना लस मिळत नसल्याने नागरिकांचा रोष अनावर होतोय.

लसीकरणाच्या कूपन्स वाटपात काळाबाजार, भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा गंभीर आरोप
लसीकरणाच्या कूपन्स वाटपात काळाबाजार, भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा गंभीर आरोप
Follow us on

कल्याण (ठाणे) : कल्याणमध्ये एकीकडे लसीचा तुटवडा, तर दुसरीकडे नियोजनाचा अभाव असल्याचं दिसतंय. आठ आठ तास रांगेत उभे राहून देखील लोकांना लस मिळत नसल्याने नागरिकांचा रोष अनावर होतोय. याच मुद्द्यावरुन कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे. “कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेचे लसीकरणाचे नियोजन नाही. लसीकरणासाठीचे कूपन्स पाठीमागच्या दाराने दिले जात आहेत. रांगेत उभे असलेल्यांना लस मिळत नाही. लसीकरणाच्या कूपन वाटपात अधिकारी काळाबाजार करीत आहेत”, असा गंभीर आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात कूपन वाटपावरुन आज (11 ऑगस्ट) नागरीकांनी गोंधळ घालत महापालिकेच्या नियोजन अभावाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला होता. या प्रकारानंतर आमदार गायकवाड यांनी कुपन वाटपात काळाबाजार होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

गणपत गायकवाड यांचे आरोप काय?

सामान्य नागरीक रात्रीपासून लाईन लावून लसीकरण केंद्रावर रांगेत उभा राहतो. त्याचा नंबर आल्यावर कुपन्स आणि लस संपलेली असते. महापालिकेचे अधिकारीच कुपन्स पैसे घेऊन विकत असल्याचा प्रकार माझ्या कानावर आला आहे. त्यामुळे ऑफलाईन आणि ऑनलाईन लसीकरणासाठी उभे असलेल्या नागरीकांची गर्दी होते. गोंधळ उडतो.

महापालिकेला व्यवस्थित नियोजन करता येत नसल्याचा आरोप

“आम्ही दोनच दिवसांपूर्वी नागरीकांचे लसीकरण केले. त्याठिकाणी कुठल्याही प्रकारचा गोंधळ उडाला नाही. अत्यंत शिस्तबद्ध आणि पद्धतीशीरपणे शांततेत लसीकरणी प्रक्रिया पार पडली. मी खाजगी लसीकरणासाठी नियोजन करु शकतो. तर महापालिका तशा प्रकारचे नियोजन न करता नागरीकांमध्ये गोंधळ का उडवून देत आहे?”, असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

संबंधित बातमी :

कल्याणमध्ये 72 वर्षीय आजी रांगेत, 8 तास उभं राहिल्यानं तरुणही कोसळला, तरीही लसीचं कुपन नाहीच