मंडपातील वीज पुरवठा चेक करताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू; दुर्देवी घटनेने कल्याणमध्ये हळहळ

| Updated on: Sep 20, 2021 | 2:28 PM

संपूर्ण राज्यात विघ्नहर्त्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात असतानाच कल्याणमध्ये दुर्देवी घटना घडली आहे. विसर्जनासाठी मूर्ती काढल्यानंतर मंडपातील वीज पुरवठा चेक करत असताना विजेचा शॉक लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. (boy died from electric shock in kalyan)

मंडपातील वीज पुरवठा चेक करताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू; दुर्देवी घटनेने कल्याणमध्ये हळहळ
prashant chavan
Follow us on

कल्याण: संपूर्ण राज्यात विघ्नहर्त्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात असतानाच कल्याणमध्ये दुर्देवी घटना घडली आहे. विसर्जनासाठी मूर्ती काढल्यानंतर मंडपातील वीज पुरवठा चेक करत असताना विजेचा शॉक लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे कल्याणमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. (boy died from electric shock in kalyan)

कल्याणच्या एव्हरेस्टनगरमध्ये ही घटना घडली. प्रशांत चव्हाण असं या तरुणाचं नाव असून तो 28 वर्षाचा आहे. काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने दहा दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करण्यता येत होतं. कल्याण-डोंबिवलीतही हा उत्साह पाहायला मिळत होता. कल्याण पश्चिमेतील बेतुरकर पाडा येथील एव्हरेस्टनगर परिसरातील एव्हरेस्टनगर मित्र मंडळ काही वर्षापासून गणोशोत्सव साजरा करीत आहे. यंदाही दहा दिवसाचा गणपती मंडळाने बसवला होता. मात्र विसजर्नाच्या दिवशी या मंडळावर एकच दु:खाचा डोंगर कोसळला.

उपचारादरम्यान मृत्यू

काल संध्याकाळी कल्याणमध्ये जोरदार पाऊस होता. या पावसादरम्यानच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणपती विसजर्नासाची तयारी सुरू केली होती. या तरुणांनी गणेश विसर्जनाची मिरवणूकही सुरू केली होती. मात्र, काही अंतरावर गेल्यावर गणपती मंडळातील वीज पुरवठा बंद केला की नाही याबाबत काही जणांना शंका आली. त्यामुळे वीज पुरवठा सुरू आहे की नाही हे चेक करण्यासाठी प्रशांत मंडपात गेला. मात्र, मंडपात गेल्यानंतर वीज पुरवठा चेक करत असताना त्याला जोरदार शॉक बसला. त्यामुळे तो जागीच कोसळला. त्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. प्रशांतच्या मागे त्याची आई आणि त्याचा लहान भाऊ आहे. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. या घटनेचा तपास कल्याणचे महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.

मुंबईत पाच मुले बुडाली

गणपती विसर्जनादरम्यान अंधेरीच्या वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. विसर्जन करत असताना 5 मुले खोल समुद्राच्या दिशेने गेली. त्या मुलांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही मुले पाण्यामध्ये बुडाली. ही घटना निदर्शनास येताच तेथील स्थानिक रहिवाश्यांनी तात्काळ धाव घेऊन मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यावेळी दोघांना वाचवण्यात आले, मात्र 3 मुलांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने गणपती विसर्जनादरम्यान तैनात केलेल्या जीवरक्षक तसेच अग्निशमन दलाच्या साहाय्याने बेपत्ता मुलांचा शोध घेतला जात आहे.

पुण्यात दोघे, अमरावतीत एकजण बुडाला

पुणे जिल्ह्यातही गणपती विसर्जनादरम्यान दोन मुले बुडाली. मोशी आळंदी रोडवर इंद्रायणी नदी पात्रात गणपतींचे विसर्जन सुरू असताना दोन मुले बुडाल्याची घटना घडली. दत्ता ठोंबरे (20) आणि प्रज्वल काळे (18) अशी या मुलांची नाव आहे. प्रज्वल काळे हा ठोंबरे यांचा नातेवाईक होता. गणपतीनिमित्त तो पुण्यात आला होता. घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. बुडालेल्या मुलांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या मुलाचा शोध घेतला जात आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील 17 वर्षीय अरमान पठाण या मुलाचा बासलापूर तलावात बुडून मृत्यू झाला. पोहताना गाळात पाय फसल्याने तो बुडाला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात काका आणि इतर दोन भाऊही गाळात फसले होते. पण, गणपती विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी त्यांचे प्राण वाचवले. मात्र अरमानच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. (boy died from electric shock in kalyan)

 

संबंधित बातम्या:

गणपती विसर्जनाला गालबोट; मुंबईत 5 मुले बुडाली; दोघांना वाचविण्यात यश, तर तिघे अद्याप बेपत्ता

ऋतुराज गायकवाडची दुबईत दबंगगिरी, बोल्ट-बुमराहची धुलाई करत मुंबईला नमवलं

Bigg Boss Marathi | कलाकारांपासून ते कीर्तनकारांपर्यंत जाणून घ्या बिग बॉस मराठीच्या घरातील 15 स्पर्धकांची नावं, आता अनलिमिटेड मनोरंजन !

(boy died from electric shock in kalyan)