ठाणे, शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार झाला (Cabinet Expansion Maharashtra). भाजपचे डोंबिवलीतील आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मंगळवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. चव्हाण यांच्यामुळे डोंबिवलीला दुसऱ्यांदा मंत्रिपद मिळाले आहे. चव्हाण यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच डोंबिवलीत भाजपचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष केला. राज्यात भाजपची सत्ता आणण्यास हातभार लावणारे आमदार चव्हाण यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू होती. राज्यात शिंदे व फडणवीस सरकारला मनसेने समर्थन दिले आहे. राज्यसभा निवडणुकीत मनसेचे आमदार राजू पाटील यांचे मत भाजपसाठी महत्वाचे ठरले होते.
त्यांच्या सहकार्यामुळे पाटील यांनादेखील मंत्रिपद दिले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच सोमवारी रात्रीपासूनच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सोशल मीडियावर चव्हाण यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद मिळाल्याने आम्ही आज दिवाळी साजरी केली आहे, मनसेचे आमदार राजू पाटील यांनादेखील या सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यास आम्ही दसरा साजरा करू, अशी प्रतिक्रिया या वेळी कल्याण जिल्हा उपाध्यक्ष माळी यांनी व्यक्त केली.
हे सरकार महाराष्ट्राचे हित जपणारे असून येत्या काळात गतिमान कारभार हाकेल असा विश्वास भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. शिवसेनेतील शिंदे गट आणि भाजपने राज्यात सत्तांतर घडून आणले. गेल्या एक महिन्यांच्यावर या सरकारने महाराष्टाचा गाडा हाकला. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सातत्याने हे सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधकाकडून होऊ लागला. तसेच फुटलेले सर्वच आमदार मंत्रीपद मागत असल्यानेच मंत्रीमंडळाला मुहुर्त लागत नसल्याचा आरोप होत होता. अखेर या सर्व घडामोडीवर आज मंगळवारी, 9 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारातून पडदा पडला. शिंदे गटात माणसे खेचून आणण्यात आणि संपर्क करण्यात भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी मोलाची भूमिका निभावल्याचे बोलले जात होते. त्याचेच हे बक्षिस असल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ही कामाची पावती असल्याचे सांगत चव्हाण यांनी अधिक बोलायचं टाळलं.