ठाणे | 12 नोव्हेंबर 2023 : मुंब्राप्रकरणात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण उद्धव ठाकरे यांच्याविरोधात मोर्चा उघडला. त्यांनी कालच्या घटनाक्रमावर जोरदार प्रत्युत्तर दिले. दिवाळी आली फुसका बार आला आणि वाजलाच नाही. सर्व कार्यकर्त्यांचा फटाक्यांच्या आवाज होता त्यांना यु टर्न घ्यायला लागला, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माज उतरवणाऱ्यांना सातव्या नंबरवर पाठवलं. उद्या दहाव्या नंबरवरही जातील. लोकं त्यांना कामातून उत्तर देतील, असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर चढवला. शनिवारी मुंब्रामधील शाखा पाडल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. नाट्यमय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्र्यांनी आज या सर्व घडामोडींवर मन मोकळं केलं.
दिवाळीचा आनंद केला साजरा
मुख्यमंत्री आज सकाळीच दिवाळी पहाट कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांनी काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात. शेवटी कुठलंही काम होणार नाही हे सांगायला काही स्किल लागत नाही. मात्र न होणारं काम सांगायला स्किल लागतं, धाडसं तर लागतंच. पण जेव्हा आपला हेतू स्पष्ट असतो, चांगला असतो त्यावेळी कधीही घाबरायचं नसतं. ज्यावेळी आपला वैयक्तिक फायदा नसतो आणि जनतेचा फायदा असतो त्यावेळी बिनधास्त करायचं असतं, असा टोला यावेळी लगावला.
दिवाळीत नको विघ्न
काल मुंब्रा येथील शाखा परिसरातील वादावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडले. दिवाळीच्या सणामध्ये आशा प्रकारे विघ्न घालायला कुठल्याही राजकीय नेत्याने येण्याचे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. समोरुन अनेक मोठे नेते आले होते. जनते समोर काहीच चालत नाही. येणाऱ्या निवडणुकीत यांचा माज उतरवणार. आमच्या कार्यकर्त्यांनी देखील शिस्तीचे दर्शन घडवले, असे त्यांनी सांगितले.
वडापाव, मिसळवर मनसोक्त ताव
मुख्यमंत्र्यांनी दिवाळी सणानिमित्त आज ठाण्यात खाद्यभ्रमंती केली. त्यांनी जुन्या सहकाऱ्यांची भेट घेतली. स्थानिक शिवसैनिकांच्या वडापाव गाडीवर ते पोहचले. व्यस्ततेतून त्यांनी वेळ काढला. याठिकाणी त्यांनी वडापाववर मनसोक्त ताव मारला. त्यावेळी त्यांनी जुन्या आठवणी जागवल्या. त्यांच्या या भेटीमुळे कार्यकर्ते पण भावविभोर झाले.
मामलेदार मिसळीचा घेतला आस्वाद
शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील सुप्रसिद्ध मामलेदार मिसळीचा आस्वाद घेतला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक तथा प्रवक्ते नरेश म्हस्के तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.