ठाणे : मुंबईत वाहतूक कोंडी होत असते. त्यावरही आम्ही काम करणार आहोत. मी विरोधकांना कामातून उत्तर देईल. आरोप करण्याचा विरोधकांचा अधिकार आहे. ते त्यांनी करत राहावे. कुठे जायचं आणि कुठे नाही हा त्यांचा विषय आहे. शेवटी बाळासाहेब आणि दिघे साहेब आमचे दैवत आहेत. आता ज्याचे त्याने ठरवावे की कोठे जायचे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. एकनाथ शिंदे म्हणाले, आता निवडणूक झाली तर आमच्या जागा कमी येतील असा सर्वे आला. मात्र अशा प्रकारचे सर्वे अनेक येत असतात. त्याने काही होत नाही. काही मुठबर सँपल घेऊन वस्तुस्थिती मांडता येत नाही. त्यांनी आमच्या ग्रामपंचायतीचा झालेला विजय पाहिला असेल तर सर्वे वेगळे असता.
२०२४ मध्ये विक्रमी निवडणूक होईल. प्रचंड मोठं यश पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात दिसेल. तसंच यश महाराष्ट्रातही पाहायला मिळेल. ओपीनियन पोलमुळं कुणाला आनंद झाला असेल, तर तो त्यांनी घ्यावा. आम्ही दीड वर्षे काम करत राहू. तुम्ही दीड वर्ष या ओपीनियन पोलचा आनंद घेत राहा, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
आता दीड वर्ष निवडणुका नाहीत. त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. दीड वर्ष आम्ही काम करत राहू. येणाऱ्या सर्व निवडणुकीत त्यांना सँपल देऊ. महाविकास आघाडीकडे जे काही खासदार राहिले तेही त्यांनी राखले तरी फार होईल, असंही शिंदे यांनी म्हंटलं.
आम्ही आल्यापासून कामे जोरात होत आहेत. लोक काम करणाऱ्यांना साथ देत असतात. ज्या जागा महाविकास आघाडीकडे मागच्या वेळेस होत्या तेवढ्याही राहणार नाहीत, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला.
उद्धव ठाकरे या सर्व्हेवर बोलताना म्हणाले, आता निवडणुका झाल्या तरी महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील, असा सर्व्हे आहे. पण, महाविकास आघाडी जर घट्ट राहिली, तर महाविकास आघाडीचे लोकसभेत ४८ पैकी ४० खासदार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.