ठाणे : कल्याणमध्ये एकीकडे लसीचा तुटवडा, तर दुसरीकडे नियोजनाचा अभाव असल्याचं दिसतंय. आठ आठ तास रांगेत उभे राहून देखील लोकांना लस मिळत नसल्याने नागरिकांचा रोष अनावर होतोय. असाच प्रकार कल्याणच्या अत्रे रंगमंदिर लसीकरण केंद्रावर घडला आहे. या ठिकाणी तरुणांपासून 72 वर्षीय आजींपर्यंत सगळेच तासंतास रांगेत उभे राहिले. एका तरुणाला तर चक्कर येऊन तो कोसळला तरीही लसीसाठी रांगेतच थांबला. मात्र, लसींचा तुटवडा असल्यानं कुपन अर्ध्या तासात संपले. त्यामुळे इतका वेळ रांगेत थांबूनही हाती निराशाच आली. यामुळे नागरिकांनी एकच गोंधळ घातला. संतप्त महिला केडीएमसी उपायुक्तांच्या केबिनमध्ये दाखल झाल्या. त्यानंतर अखेर केडीएमसी उपायुक्तांनाही त्यांची केबीन सोडून लसीकरण केंद्रावर जावे लागेल.
कल्याण डोंबिवली महापालिकेचे दोन ठिकाणी लसीकरण सुरु आहे. कल्याणमधील अत्रे रंगमंदिराच्या ठिकाणी लोकांनी लसीसाठी रात्री 12 वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या. रांग इतकी मोठी होती की ती पार सुभाष मैदानला वळसा घालून होती. प्रवेशद्वाराजवळ नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मात्र, त्यांना कूपन वाटप केले जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला गेला. एका तरुणाला रांगेत जास्त वेळ राहिल्याने त्याला चक्कर आली. तो खाली कोसळला होता, तरी देखील त्याने केंद्र सोडले नव्हते. एका 72 वर्षीय आजी लसीसाठी नातवासोबत रांगेत उभ्या होत्या.
कूपन वाटपाचे काम सुरु करताच अर्ध्या तासात कूपन संपल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे सोनाली पठारे या संतप्त तरुणीने नागरिकांच्या वतीने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयात धाव घेतली. तिच्यासोबत नागरिक देखील होते. तिला सुरक्षा रक्षकांनी गेटवर अडवले. त्यानंतर तिने उपायुक्त पल्लवी भागवत यांची भेट घेतली.
पल्लवी भागवत या पोलिसांसह केंद्रावर पोहचल्या. त्यावेळी आज केवळ 1400 नागरिकांना लस दिली जाणार आहे. मात्र, नागरिक जास्त आल्याने गोंधळाची स्थिती उद्भवल्याचं सांगण्यात आलं. यावर देखरेख ठेवण्यासाठी एक अधिकारी नेमला जाईल, असे भागवत यांनी सांगितले.