भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या घटनेनंतर आता पुन्हा त्या जमिनीवरून बाद सुरु झाला आहे. बिल्डर आणि शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आमने-सामने आल्याची घटना घडली. या घटनेत 3 जण जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी हिललाईन पोलिसांनी विकासक जितेंद्र पारीक आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह दोन्ही गटातील 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी महेश गायकवाड यांनी गंभीर आरोप केले आहेत. “पोलीस राजकीय दबावखाली असून काल अटक केलेल्या बिल्डरच्या समर्थकांना पोलिसांनी सोडून दिले. भाजप आमदार गणपत गायकवाड हे जेलमधून मोबाईल ऑपरेट करून सर्वांना फोन करतात. त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक भाजपचे नेते आहेत. शिवसेना पक्ष वाढू द्यायचा नाही यासाठी भाजपचा डाव आहे”, असा आरोप महेश गायकवाड यांनी केला.
दुसरीकडे विकासकाने महेश गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “गणपत गायकवाड यांचा घटनेशी संबंध नसून ती जागा आमचीच आहे. आमच्या जागेवर महेश गायकवाड काही लोकांसोबत जबरदस्ती शिरले. त्यांनी खंडणी मागत आमच्या लोकांना मारहाण केली. याआधीही महेश गायकवाड, त्यांचा सहकारी राहुल पाटील यांच्यावर याच प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आम्हाला संरक्षण देत महेश गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करावी”, अशी मागणी विकासकाने केली आहे.
उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणावर वायरल झाल्याने देशभरात खळबळ उडाली. या घटनेला सहा महिने उलटत नाही तोच पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटले आहे. ज्या जमिनीवरून ही फायरिंग झाली त्याच जमिनीवरून आता बिल्डर आणि महेश गायकवाड हे आमने-सामने आले.
अंबरनाथच्या द्वारली गावातील या जमिनीच्या ठिकाणी पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं. बिल्डर आणि त्याची माणसं त्याचप्रमाणे महेश गायकवाड आणि त्यांचे समर्थक तसेच शेतकरी हे एकमेकांना भिडले. त्यामुळे पुन्हा हिललाईन पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. सोमवारी बिल्डर आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हे दाखल झाले. त्यानंतर महेश गायकवाड आणि त्याच्या साथीदारांवर बिल्डरने दिलेल्या तक्रारीनुसार, गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे जमिनीवरून पुन्हा दोन गट एकमेकांना भिडले.
याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. बिल्डर पारेक यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर आरोप केले आहे. तर महेश गायकवाड यांनीही थेट गणपत गायकवाड यांच्यासह भाजपवर निशाणा साधलाय.
संबंधित बिल्डर हा शस्त्रधारी गुंडांना घेऊन जमिनीची मोजणी करण्यासाठी पोलीस बंदोबस्त न घेता आल्यानं शेतकरी चांगले संतापले. त्यांनी महेश गायकवाड यांना संपर्क केला. त्यानंतर महेश गायकवाड आपल्या समर्थकांसह त्या ठिकाणी पोहोचले. हिल लाईन पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी काही लोकांना अटक केली.
त्यानंतर आता बिल्डर पारेख याने ती जागा आमचीच असून सर्व प्रक्रिया पूर्ण करून आम्ही ती जागा विकत घेतली आहे. या जागेला लागून असलेल्या दुसऱ्या जागेत एका बिल्डरने काम करत असताना माझ्या जमिनीचे सुद्धा खोदकाम केले. त्यामुळे जमिनीची मोजणी करण्यासाठी आम्ही पोलीस बंदोबस्त मिळावा म्हणून अर्ज केला होता. मात्र तो मिळाला नाही, असं स्पष्टीकरण बिल्डरने दिलं आहे.
संबंधित शेतकऱ्यांनी एकच जमीन अनेकांना विकली असून भरपूर पैसे लाटण्याचा देखील आरोप बिल्डरने केला आहे. महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर याआधी सुद्धा याच प्रकरणी गुन्हे दाखल झाले असून आता पुन्हा ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना बेल मिळू नये, असं सुद्धा बिल्डर म्हणाले.
दरम्यान, आमदार गायकवाड यांना षडयंत्र करून मला अडकवायचं होतं आणि त्यांचा हा डाव यशस्वी झाला आहे, असं सांगत महेश गायकवाड यांनी गणपत गायकवाड यांच्यावर निशाणा साधला. शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर मी अनेक गुन्हे अंगावर घेईन, असं सांगत शिवसेना पक्षाचं खच्चीकरण करण्यासाठी भाजपकडून असे डावपेच सुरू असल्याचं ते म्हणाले.
दोन्ही गटाकडून जमिनीच्या वादावरून पुन्हा आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत. आता एकूण 30 जणांवर याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आता हा जमिनीचा वाद आणखीन कोण कोणती नवीन वळण घेणार ते पाहावं लागेल. आगामी विधानसभा निवडणुकीमध्येही या वादाचे पडसाद इच्छुक उमेदवारांमध्ये उमटू शकतात, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.