राजकारणात लांबलांब जीभा काढून बडबड करण्याची सवय; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

| Updated on: Oct 08, 2021 | 1:14 PM

ठाण्यात महारक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. सात दिवस हे शिबीर सुरू राहणार आहे. या शिबीराला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा सवाल केला. (cm uddhav thackeray address blood donation camp in thane)

राजकारणात लांबलांब जीभा काढून बडबड करण्याची सवय; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
cm uddhav thackeray
Follow us on

ठाणे: हल्ली राजकारणात नवी कीड लागली आहे. लांबलांब जीभा काढून बडबड करण्याची काही लोकांना सवय लागली आहे. त्यांच्या असे महारक्तदान शिबीर घेण्याची हिंमत आहे का?; असा सवाल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी केला आहे.

ठाण्यात महारक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. सात दिवस हे शिबीर सुरू राहणार आहे. या शिबीराला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा सवाल केला. हल्ली राजकारणात कीड लागली आहे. लांबलांब जीभा काढून बडबड केली जात आहे. असं रक्तदान शिबीर घेण्याची त्यांच्यात हिंमत आहे का? तुम्ही आवाहन केलं तर रक्तदानासाठी अशी गर्दी उसळेल का? आम्ही बघत नाही हे रक्त कुणाला जातं. ज्याला आवश्यक आहे त्याला रक्त जात आहे. जीवदान देणारे हे कार्यक्रम कुठे दिसत नाही. कर्तव्य म्हणून शिवसैनिक मोठं काम करत आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

टेंभी नाक्याचा नवरात्र विसरू शकत नाही

हे चित्रं फार विरळ आहे. महारक्तदान शिबीर सुरू झाल्यावर मी विचारात गढून गेलो होतो. नवरात्र सुरुवात झाली आहे. कालपासून आपल्या सर्व मंदिरांची द्वारं उघडली आहे. नवरात्रं उत्सवामुळे मीही आठवणीत रमलो. टेंभी नाक्याचा नवरात्र मी विसरू शकत नाही. परंपरा असते. ती सुरू करणं हे मोलाचं असतं. ती चालू ठेवणं हे जिकरीचं असतं. ते काम अव्याहतपणे सुरू ठेवलं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हेच आमचं हिंदूत्व

दिघे साहेबांसोबत मी जगदंबेच्या दर्शनाला येत होतो. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि इतरांनी ही परंपरा सुरू ठेवली. एक दोन वर्ष मी दर्शनाला आलो नाही. त्यात खंड पडला. पण ती उणीव भरून काढेन. मी आई जगदंबेच्या आणि ठाणेकरांच्या दर्शनाला येणार आहे. ही आपली परंपरा आहे. हिंदुत्वाची परंपरा आहे. हिंदुत्वाची परंपरा राखत असताना आपण नवरात्रीत दुर्गामातेची पूजा करतो. आपण ज्या मातेची पूजा करतो ती एक मोठी शक्ती आहे. महिषासूर, नरकासूरासह जेवढे जेवढे असूर आले त्यांचा या जगदंबने, आदिमायेने त्या त्या युगात संहार केला. तिच्या हातात शस्त्र आहे. आमचं हिंदुत्व असं आहे. अन्याय होतो तो चिरडून टाकणं आणि गोरगरीबांचं रक्षण करणं हेच आमचं हिंदुत्व आहे. हे रक्षण करताना नाक्या नाक्यावर तलवारी घेऊन उभं राहण्याची गरज नाही. तुम्ही लोकांचा जीव वाचवत आहात हे पवित्रं काम आहे. तुम्ही रक्त न सांडता रक्तदान करून लोकांचे जीव वाचवत आहात. तेच काम कायम ठेवा, असं ते म्हणाले.

ही सत्यनारायणाची पूजा नाही

महारक्तदान करण्याचे किती राजकीय पक्ष आपले कर्तव्य पार पाडत असतील? किती लोकं समाज रक्षणाचं काम करत असतील? समाजसेवा किती जण करत असेल? ही गर्दी म्हणजे सत्यनारायणाची पूजा नाही. प्रसाद वाटण्याची गोष्ट नाही. कोणतीही गोष्ट वाटण्यासाठी बोलावलं नाही. ते देण्यासाठी येत आहेत. स्वत:हून रक्त देणं यासाठी किती लोक कार्यक्रम करत आहेत?; असा सवालही त्यांन केला.

 

संबंधित बातम्या:

महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट व्हावं, शरद पवारांची हाक

VIDEO: दिल्लीने कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही; सुप्रिया सुळेंनी ठणकावले

झेडपीला शिवसेनेला झटका, मग मुंबई पालिका कशी लढणार? आघाडी की स्वबळ? राऊतांचं थेट उत्तर

(cm uddhav thackeray address blood donation camp in thane)