ठाणे: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या युतीची जोरदार चर्चा सुरू असतानाच शिंदे गट आणि दलित पँथरच्या युतीचीही चर्चा सुरू झाली आहे. दलित पँथरचे संस्थापक आणि दिवंगत नेते नामदेव ढसाळ यांचे भाचे सुखदेव सोनावणे यांच्याशी शिंदे गटाची युती होणार आहे. मात्र, सुखदेव सोनावणे यांची दलित पँथरमधून कधीच हकालपट्टी झालेली आहे. त्यांचा दलित पँथरशी काहीच संबंध नसल्याचं दलित पँथरने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिंदे गट आणि पँथरच्या युतीतील हवाच निघून गेली आहे.
दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पँथरची शिंदे गटाशी युती होणार असल्याचं कळलं. सुखदेव सोनवणे हे पुण्याचे आहेत. नामदेव ढसाळ यांचे भाचे आहेत. त्यांच्याशी शिंदे गटाची युती होणार असल्याचं कळतं. हा माणूस एक नंबरचा फ्रॉड आहे. चिटर आहे. त्यांना पँथरमधून काढलेलं आहे. त्यांचा पँथरशी काहीच संबंध नाही, असं रामभाऊ तायडे म्हणाले.
पद्मश्री नामदेव ढसाळ यांनीच त्या व्यक्तीला केव्हाच पार्टीतून काढलेलं आहे. परंतु तरीही तो संघटनेचे नाव लावतो, नामदेव ढसाळ यांचा फोटो लावतो. आणि कुठंतरी तोडपाणी करतो, असं ते म्हणाले. नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमरशेख यांनीच मला एक वर्षांपूर्वी राष्ट्रीय पँथरचं अध्यक्षपद दिलं आहे. तसेच राजकीय वारस म्हणूनही घोषित केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी काम केलं आहे. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की अशा लोकांपासून सावध राहावं. शहानिशा करूनच चांगल्या लोकांना तुमच्या पक्षात प्रवेश द्यावा, असं आवाहनही तायडे यांनी केलं.
आमची संघटना 15 ते 16 जिल्ह्यात पोहोचलेली आहे. आमची संघटना संपूर्ण महाराष्ट्रात ताकदीने उभी राहिली आहे. ठाणे शहरातून आमचं मुख्य कार्य चालतं. आमचं काम जोरात सुरू आहे. पण काही भोंदू लोक थोड्या पैशासाठी संघटनेचं नाव बदनाम करत आहेत. ते चुकीचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
यांनी आधी राष्ट्रवादीसोबत तोडपाणी केली. आता तुमच्यासोबत येत आहेत. त्यामुळे या लोकांपासून वेळीच सावध व्हा. त्यांचा पँथरशी काडीमात्र संबंध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.