कल्याण: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाने माजी नगरसेवक घरांच्या रजिस्ट्रेशनसाठी पैसे उकळत असल्याचा मेसेज कल्याणमध्ये व्हायरल झाला आहे. या व्हायरल मेसेजमुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या मेसेजशी आपला काही संबंध नसून आपल्या नावाने बदनामीकारक मजकूर पाठवणाऱ्यावर कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषण करू, असा इशारा माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिला आहे. या प्रकरणी मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
माजी नगरसेवक कुणाल पाटील हे नाना पटोलेंच्या नावाने घरांच्या नोंदणीसाठी पैसे उकळत असल्याचा मेसेज व्हायरल झाला. त्यामुळे कुणाल पाटील प्रचंड संतापले आहेत. पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाशी आपला काडीचा संबंध नसल्याचं सांगितलं. कुणी तरी हा खोडसाळपणा केला आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात आपण पोलिसात तक्रार दिली आहे. तसेच या प्रकरणी लवकरात लवकर ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित व्यक्तीला अटक केली नाही तर पोलीस आयुक्तालयासमोरच आमरण उपोषण करू, असा इशाराच कुणाल पाटील यांनी दिला आहे.
कल्याण डोंबिवलीतील 27 गावांमध्ये घरांचे रजिस्ट्रेशन बंद आहे. या गावात बेकायदा बांधकामे झालेली आहेत. या बेकायदा बांधकामे असलेल्या बेकायदेशीर घरांच्या खरेदी केल्यास सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहे. ही फसवणूक रोखण्यासाठी घरांचे रजिस्ट्रेशन बंद करण्यात आलं आहे. तरी देखील काही मंडळी घरांची नोंदणी करण्यासाठी टोकन देऊन नागरिकांकडून 70 हजार ते 2 लाख रुपये घेत आहेत, असा गंभीर आरोप समाजिक कार्यकर्ते नरसिंग गायसमुद्रे यांनी केला होता.
या घोटाळ्यात लोकप्रतिनिधी आणि राजकीय मंडळींसह अधिकारी वर्गाचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या आरोपाची गंभीर दखल घेत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. कारण पाटील हे देखील कल्याण ग्रामीणचे आमदार आहेत. जो कोणी या प्रकरणात असेल त्याचे नाव चौकशीतून समोर येईल यासाठी त्यांनी चौकशीची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर घरांच्या रजिस्ट्रेशनच्या नावाखाली एक माजी अपक्ष नगरसेवक हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाने पैसे उकळत असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला गेला. या प्रकरणाशी माझा काडीचाही संबंध नाही. ज्या कोणी हा मेसेज व्हायरल करून पटोलेंसह माझी बदनामी केली आहे. त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मेसेज व्हायरल करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अन्यथा ठाणे पोलीस आयुक्त कार्यालय किंवा मानपाडा पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.
Video | MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 11 December 2021#News | #NEWSUPDATE https://t.co/eUjpv31kyT
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2021
संबंधित बातम्या:
जितेंद्र आव्हाड म्हणतात, राष्ट्रवादीला सर्व मार्ग खुले; विनायक राऊत म्हणाले, बंधन नाही
मुसळधार पाऊस खिडकीत उभा राहून… नव्हे, उभी राहून पाहा… राऊतांची जोरदार कविता, पवारांची हसून दाद
Kashi Vishwanath Corridor: विकासाचा युगारंभ, काळाच्या उदरात गडप होणाऱ्या परंपरांना मोदींकडून संजीवनी