अंबरनाथ : अंबरनाथ शहरात बुधवारपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र आता लहान मुलांचं लसीकरण कधी होणार? असा सवाल पालकवर्गाने उपस्थित केला आहे. शाळा बंद ठेवून मुलांचं शैक्षणिक नुकसान नको, पण किमान त्यांचं लसीकरण करून सुरक्षिततेची काळजी तरी घ्या, अशी मागणी पालकवर्गाकडून केली जातेय.
गेली दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या शाळा अखेर 15 डिसेंबरपासून सुरू झाल्या आहेत. शाळांमध्ये पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांनी उत्साहाने हजेरी लावलीये. मात्र एकीकडे मुलांच्या डोक्यावर फुलं टाकून त्यांचं स्वागत करणाऱ्या शाळांनी मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी मात्र झटकून टाकलीये. कारण जे विद्यार्थी शाळेत येत असतील, त्यांच्या पालकांकडून लेखी हमीपत्र मागवलं जातंय. यामध्ये जर मुलांना शाळेत आल्यामुळे कोरोना किंवा अन्य काही झालं, तर त्याची जबाबदारी आमची असेल, असं पालकांकडून लिहून घेतलं जातंय. शाळांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पालकवर्ग मात्र धास्तावून गेलाय. त्यामुळे आता लहान मुलांचं लसीकरण करण्यात यावं, अशी मागणी पालवर्गाकडून केली जातेय.
गेली दोन वर्ष शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी फक्त ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून होते. मात्र या शिक्षणात विद्यार्थी खरोखर किती शिकले? हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे आता कुठेतरी शाळा सुरू झाल्याचं पालकांना समाधान असलं, तरी सुरक्षिततेची जबाबदारी मात्र शाळा घेत नसल्यानं पालक चिंतेत पडले आहेत. मुलांचं शैक्षणिक नुकसानही नको आणि सुरक्षाही हवी, अशी भूमिका पालकांची असल्यानं आता पालकांकडून लहान मुलांचं लसीकरण करण्याची मागणी केली जातेय. याकडे आता सरकार गांभीर्यानं लक्ष देतं का? हे पाहावं लागेल. (Demand for vaccination of children from parents in Ambernath)
इतर बातम्या
Kalyan: कल्याणमध्ये रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी गेला अन् ओमिक्रॉनचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह