ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत वादाला तोंड फुटलं आहे. भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये टोकाचे वाद निर्माण झाले आहेत. डोंबिवली बॅनर प्रकरणानंतर शिवसेना शिंदे गट भाजप पदाधिकार्यांमध्ये कुरघोड्या सुरूच आहेत. आता हा वाद विकोपाला गेला आहे. दीपेश मला गणपत गायकवाड व्हायचं नाही. भाऊ मला महेश पाटील व्हायचं नाही, अशी पोस्ट व्हायरल करत मला धमकवत असल्याचे आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे युवासेना प्रदेश सचिव दीपेश मात्रे यांनी केला आहे. याबाबात दीपेश यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. डोंबिवली विधानसभा मतदार हा भाजपचा बालेकिल्ला असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे या मतदार संघातून तीनदा मोठ्या मताधिकक्याने निवडून आले आहेत. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून दीपेश म्हात्रे इच्छुक आहेत. त्यांनी देखील निवडणूक लढण्याची तयारी सूरु केली आहे. त्यामुळे महायुतीत या जागेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात बॅनरबाजी करणारे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणी पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर दिपेश म्हात्रे यांनी विष्णू नगर पोलीस स्टेशनमध्ये जात पोलिसांसमोर आपली बाजू मांडली.
रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाला दिपेश म्हात्रे यांनी खड्ड्यांचे बॅनर लावले. त्यानंतर पुन्हा शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये नवा वाद निर्माण झाला. सोशल मिडियावर दिपेश मला गणपत गायकवाड व्हायचे नाही. तसेच भाऊ मला महेश पाटील व्हायचं नाही, अशी पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असे सांगत दिपेश म्हात्रे यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे तक्रार केली. संबंधितांवर ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
दीपेश म्हात्रे यांच्या तक्रारीनंतर भाजप देखील आक्रमक झाली आहे. दीपेश म्हात्रे यांनी अर्ज देताना वापरलेल्या पत्रावर केडीएमसीचा लोगो असल्याचं आढळून आलं. त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे, नंदू परब यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. दीपेश म्हात्रे यांनी जो पत्र व्यवहार केला. त्यावर केडीएमसीचा लोगो आहे. म्हात्रे माजी स्थायी समिती होते. आता प्रशासकिय राजवट असताना ते केडीएमसीचा लोगो कसा वापरु शकतात? असा सवाल करत म्हात्रे यांच्यावर ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत आता युतीतील वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.