डोंबिवली एमआयडीसीत स्फोट होऊन तीन दिवस उलटले आहेत. या दुर्घटनेत एकूण 8 कामगारांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. पण हा आकडा 11 वर गेल्याचंही सांगितलं जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. रोज कुणाच्या ना कुणाच्या मृतदेहाचे पार्ट्स मिळत आहेत. एखाद्या कामगाराच्या मृतदेहाचे अवयव मिळताच ते रुग्णालयात पाठवले जात आहेत. तर त्यापाठोपाठ कामगारांचे नातेवाईकही ओळख पटवण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात जात आहे. या दुर्घटनेतील काही कामगार अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून कामगारांचे नातेवाईक कंपनीजवळ घिरट्या घालत आहेत. आमचा माणूस आज सापडेल उद्या सापडेल या आशेवर येत आहेत. पण त्यांच्या हाती काहीच लागत नाहीये. तर वणवण करणाऱ्या या लोकांना पोलीस पिटाळून लावत आहे.
तीन दिवसांपूर्वी कंपनीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच कामगारांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याने त्यांना कंपनीजवळ जाऊ दिलं जात नव्हतं. आज तिसऱ्या दिवशीही त्यांना कंपनीच्या परिसरात फिरकू दिलं जात नाही. आपल्या नातेवाईकांचा शोध घ्यायला आलेल्यांना पिटाळून लावलं जात आहे. पोलीस स्टेशन, रुग्णालयातील शवागृहे तपासल्यानंतर हे नातेवाईक आता कंपनीच्या गेटजवळ येऊन थांबले आहेत. ढिगाऱ्याखालून मृतदेह निघेल आणि आपला माणूस सापडेल अशी आशा त्यांना लागली आहे. कामगारांचे कुटुंबीय एकटक रेस्क्यू ऑपरेशनकडे डोळे लावून पाहत आहे. काही तरी चमत्कार होईल अशी आशा त्यांना आहे. काहीजण आजही धायमोकलून रडत आहेत. तर काहींचे डोळे रडून रडून सुजले आहेत.
माझा मोठा दीर सापडत नाहीये. तीन दिवस झाले आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. स्फोट झाल्यापासूनच ते गायब आहेत. पोलीस ठाण्यात शोधलं, हॉस्पिटलला जाऊन शोध घेतला. त्यांचा कुठेच पत्ता लगात नाही. आम्ही कंपनीच्या शोध कामाच्या ठिकाणी आलोय. पण आम्हाला जवळ जाऊ देत नाहीये, आम्हाला मारहाण केली जात आहे. आम्ही आमच्या नातेवाईकांचा शोधही घेऊ नये का? असा सवाल मोनिका राजपूत करतात.
माझा नवरा राकेश सिंह गेल्या तीन दिवसांपासून सापडत नाहीये. मला माझा नवरा पाहिजे. माझा नवरा कसाही असू द्या. तो मला हवा आहे. तीन दिवसांपासून मी रुग्णालयात शोध घेतेय. पोलीस ठाण्यात जाऊन आले. काही माहिती मिळाली तर फोन करून सांगतो असं पोलीस म्हणत आहेत. एकदा पोलिसांचा फोन आला. म्हणाले बॉडी मिळाली. आम्ही जाऊन पाहिलं तर ती माझ्या नवऱ्याची बॉडी नव्हती. मला न्याय द्या, असं एक महिला टाहो फोडून सांगत होती. माझा दीर भावाला शोधायला रेस्क्यू ऑपरेशनच्या ठिकाणी गेला तर त्याला पोलीस मारत आहेत. तुझा नवरा कामावर आलाच कशाला? मी त्याला बोलावलं होतं का? असा सवाल कंत्राटदार पुजारी शेठ करत असल्याचा आरोपही या महिलेने केला.
माझा मेव्हणा इथे कलर कंपनीत काम करत होता. त्यांना सर्व ठिकाणी शोधलं. पण सापडत नाही. कंपनीजवळ गेलो तर पोलीस मारत आहेत. शोध घेऊ देत नाहीत, असं एका तरुणाने सांगितलं.