डोंबिवली | 16 सप्टेंबर 2023 : डोंबिवली पूर्वेकडील आयरे गावात एक जीर्ण इमारत कोसळल्याने (Dombivli Building Collapse) खळबळ माजली होती. शुक्रवारी दुपारच्या सुमारास आदिनारायण नावाची ही तीन मजली इमारत कोसळली. सोसायटीची ही इमारत खूप जुनी झाल्याने जीर्णावस्थेत होती. ही इमारत जमीनदोस्त झाल्याने तेथे राहणाऱ्या कुटुंबियांपैकी अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. बचावपथकाच्या अधिकाऱ्यांनी अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर ढिगाऱ्याखालील नागरिकांना बाहेर काढण्यात यश मिळालं असून शोधकार्य थांबवण्यात आलं आहे. बाहेर काढण्यात आलेल्या तिघांपैकी दोघांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला आहे. तर एक महिला सुखरूप असून तिची प्रकृती स्थिर आहे.
डोंबिवली पूर्वेकडील आयरे गाव – दत्तनगर परिसरात ही इमारत होती. आदिनारायण सोसायटीती ही इमारत खूप जुनी असून जीर्णावस्थेत होती. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांतर्फे इमारतीतील रहिवाशांना दुसरीकडे स्थलांतरित होण्यासाठी नोटीसही बजावली होती. डोंबिवलीत दोन दिवसांपासून सतत पाऊस कोसळत होता. सततचा पाऊस आणि जीर्णावस्था यामुळे अखेर शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही इमारत जमीनदोस्त झाली आणि अनेक जण त्याखाली अडकले.
अनेक तास सुरू होतं बचावकार्य
केडीएमसीच्या नोटीशीनंतर काही कुटुंबानी सुरक्षितस्थळी जाण्याचा निर्णय घेतल्याने ते बचावले. पण काही कुटुंब तेथेच वास्तव्य करत होती, त्यामुळे इमारत कोसळल्यानंतर त्यापैकी अनेक काही जण आत अडकले. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी तसेच महापालिकेचे कर्मचारी आणि TDRFच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत युद्ध पातळीवर शोध व मदतकार्य सुरू केले. बचाव पथकाकडून ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू करण्यात आलं. अखेर अनेक तासांच्या प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश मिळालं. मात्र दुर्दैवाने त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दीप्ती लोढिया या 54 वर्षीय महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर सुनिल लोढिया आणि अरविंद भाटकर अशी मृतांची नावे आहेत.
“ ही इमारत खचत असल्याचे समजल्यानंतर आमचे सहाय्यक आयुक्त आणि इतर सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इमारतीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरूवात केली. मात्र तरीही काही जण अडकल्याचे समजले. ही इमारत धोकादायक असल्याने इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना याधीच नोटीस देण्यात आली होती. लोकांना तेथून बाहेरही काढण्यात आलं, पण काही लोक तिथे पुन्हा वास्तव्यासाठी गेले. त्यानंतर ही दुर्घटना घडली. दरम्यान ही इमारत खचल्यानंतर आजूबाजूच्या इमारतीदेखील खाली करण्यात आल्या आहेत. त्या इमारतीदेखील पाडून टाकण्यात येतील”, असे केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.