ठाणे : डोंबिवलीमध्ये मध्यरात्री टँकर माफियांवर उदय सामंत यांनी धाड मारली. कल्याण डोंबिवली पालिकेचे पाणी चोरी करुन विकणाऱ्या कारखान्याला सिल करत टँकर पोलिसांनी ताब्यात घेतले. डोंबिवली पाणी समस्यांचे कारण टँकर माफिया पालिकेचे पाणी चोरून दुप्पट तिप्पट किमतीने नागरिकांना विक्री करायचे. हा गोरखधंदा आता बंद होणार आहे. डोंबिवली शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या संपूर्ण भाग टँकरवर अवलंबून आहे. यामुळे या परिसरात टँकर माफिया वाढले. दुप्पट किमतीने येथील नागरिकांना टँकरच्या मार्फत पाणीपुरवठा केला जात होता.
या टँकर माफियांचा पर्दाफाश शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. मध्यरात्री डोंबिवलीमध्ये धाड टाकून बेकायदेशीर टँकर कंपनीला सील ठोकलं आहे. या धाडीत कल्याण डोंबिवली पालिकेचे पाणी चोरी करून हे टँकर माफिया पाणी विकत असल्याचे समोर आली आहे. डोंबिवलीत पाणी समस्यांचे कारण देखील हे टँकर माफिया असल्याचे समोर आले आहे.
रात्री एकूण चार ठिकाणी ही धाड टाकण्यात आली आहे. पालिकेचे पाणी चोरून अवैध मिनरल वॅाटरचा कारखाना उभारलेला आहे. या कंपनीत हजारो लिटरच्या अवैध टाक्या बांधण्यात आल्या होत्या. हे सर्व कारखाने सिल करुन टँकर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मंत्री उदय सामंत यांनी टँकर चालकांचे परवाने जागच्या जागी रद्द केले. त्याच बरोबर टँकर लॅाबीचे ऑडिट करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
मंत्री उदय सामंत म्हणाले, गेल्या १५-२० दिवसांत पाणी कमी झाल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या. त्यामुळे रात्री साडेबारा वाजता वस्तुस्थिती बघीतली. महापालिका आणि एमआयडीसी येथील मुख्य लाईनवरून काही टँकर माफियांनी कनेक्शन घेतले आहेत. पोलिसांना सूचना दिल्या की त्यांच्यावर उद्या पोलीस केस दाखल झाल्या पाहिजे.
खरच पाणीचोरी होते की नाही, हे पाहण्यासाठी स्वतः उदय सामंत रात्री गेले होते. त्यांच्यासोबत पोलीस ताफाही होता. पाण्याची चोरी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी ही कारवाई केली. त्यामुळे टँकर माफियांचे धाबे दणाणले आहेत.