उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेचं डम्पिंग ग्राउंड मलंगगड परिसरातील उसाटणे गावाजवळ येणार आहे. या डम्पिंगच्या जागेच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी विरोध केला, तर कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनीही या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. सत्तेचा माज आला असेल, तर मी माज काढेन, अशा शब्दात गायकवाड यांनी आपला रोष व्यक्त केला.
उल्हासनगर शहराला स्वतःचं अधिकृत डम्पिंग ग्राउंड नसून सध्या गायकवाड पाडा भागातल्या खदाणीत अवैधरित्या कचरा टाकला जातो. या ठिकाणचीही क्षमता आता संपली असून त्यामुळे शासनाने मलंगगड परिसरातील उसाटणे गावजवळची जागा उल्हासनगर महापालिकेला डम्पिंगसाठी दिली. मात्र या डम्पिंगला स्थानिकांनी विरोध दर्शवला.
यानंतर कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर महापालिका आणि गावकरी यांची एकत्र बैठक घेत तोडगा काढण्याची तयारी दर्शवली. मात्र तरीही उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी या डम्पिंगच्या जागेची मोजणी करण्यासाठी पोहोचले. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालत जाब विचारला. याचवेळी तिथे आलेल्या आमदार गणपत गायकवाड यांनीही अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला.
आपलं आयुक्तांशी बैठकीबाबत बोलणं झालेलं असतानाही अधिकाऱ्यांनी मोजणीसाठी येणं चुकीचं असल्याचं आमदार गायकवाड म्हणाले. ज्याठिकाणी डम्पिंगला जागा दिली आहे तिथून 50 मीटरवर शाळा असून तिथे आजूबाजूच्या गावातले अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे डम्पिंग अन्यत्र हलवण्याची स्थानिकांची मागणी आहे. मात्र उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी दडपशाही करत असल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला.
(Dumping of Ulhasnagar will come in Malanggad area, MLA Ganpat Gaikwad and villagers oppose)
हे ही वाचा :
राज्यातील 11 जिल्ह्यांवर लॉकडाऊनचं संकट?, कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी निर्णय होण्याची शक्यता