ठाणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने धाड मारली आहे. पवार यांच्या नातेवाईकांच्या कार्यालय आणि घरांवरही धाडी मारण्यात आल्या आहेत. त्यावर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी खरे गुन्हेगार शोधावेत. अन्यथा या यंत्रणांवर कुणाचाही विश्वास बसणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
ठाण्यात महारक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर हा जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी झाला पाहिजे. त्याचा दुरुपयोग होऊ नये. नाहीतर यंत्रणांवर कुणाचाही विश्वास राहणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणेने खऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करावी, असं शिंदे म्हणाले.
यावेळी त्यांनी महारक्तदान शिबीरावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही महारक्तदानाचे आयोजन केले आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी पालघर आणि ठाणे जिल्ह्याने रक्तदान शिबीराचा कार्यक्रम घेतला आहे. अनेक जण या ठिकाणी रक्तदान करत असून या शिबीराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या शिबीराला शुभेच्छा दिल्या आहेत, असं सांगतानाच रक्तदानाचे काम मोठे आहे आणि ते धाडस फक्त शिवसेनेत आहे. शिवसेना कोणत्याही दबावाला घाबरणार नाही. लोकोपयोगी कामे शिवसेना करतच राहणार, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या शिबीराला मार्गदर्शन केलं. महारक्तदान करण्याचे किती राजकीय पक्ष आपले कर्तव्य पार पाडत असतील? किती लोकं समाज रक्षणाचं काम करत असतील? समाजसेवा किती जण करत असेल? ही गर्दी म्हणजे सत्यनारायणाची पूजा नाही. प्रसाद वाटण्याची गोष्ट नाही. कोणतीही गोष्ट वाटण्यासाठी बोलावलं नाही. ते देण्यासाठी येत आहेत. स्वत:हून रक्त देणं यासाठी किती लोक कार्यक्रम करत आहेत?; असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
दिघे साहेबांसोबत मी जगदंबेच्या दर्शनाला येत होतो. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि इतरांनी ही परंपरा सुरू ठेवली. एक दोन वर्ष मी दर्शनाला आलो नाही. त्यात खंड पडला. पण ती उणीव भरून काढेन. मी आई जगदंबेच्या आणि ठाणेकरांच्या दर्शनाला येणार आहे. ही आपली परंपरा आहे. हिंदुत्वाची परंपरा आहे. हिंदुत्वाची परंपरा राखत असताना आपण नवरात्रीत दुर्गामातेची पूजा करतो. आपण ज्या मातेची पूजा करतो ती एक मोठी शक्ती आहे. महिषासूर, नरकासूरासह जेवढे जेवढे असूर आले त्यांचा या जगदंबने, आदिमायेने त्या त्या युगात संहार केला. तिच्या हातात शस्त्र आहे. आमचं हिंदुत्व असं आहे. अन्याय होतो तो चिरडून टाकणं आणि गोरगरीबांचं रक्षण करणं हेच आमचं हिंदुत्व आहे. हे रक्षण करताना नाक्या नाक्यावर तलवारी घेऊन उभं राहण्याची गरज नाही. तुम्ही लोकांचा जीव वाचवत आहात हे पवित्रं काम आहे. तुम्ही रक्त न सांडता रक्तदान करून लोकांचे जीव वाचवत आहात. तेच काम कायम ठेवा, असं ते म्हणाले.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या निकटवर्तीयाच्या नंदूरबारमधील साखर कारखान्यावर धाड मारण्यात आली आहे. आयकर विभागाने काल 12 तास या कारखान्यात झाडाझडती घेतली. त्यानंतर आज सकाळीही छापेमारी सुरू केली आहे. साखर कारखान्याच्याबाहेर मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नंदूरबारमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
पार्थ पवार यांचे निकटवर्तीय सचिन शृंगारे यांचा नंदूरबारच्या समशेरपूर येथे आयान मल्टिट्रेट प्रायव्हेट लिमिटेड हा साखर कारखाना आहे. या कारखान्यावर काल आयकर विभागाने छापा मारला होता. आयकर विभागाचे पाच ते सहा अधिकारी ही तपासणी करत होते. मात्र आयकर विभागाच्या वतीने कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. काल 12 तासाच्या तपासणीनंतर आज सकाळी पुन्हा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीला सुरुवात केली आहे. आयकर विभागाच्या वतीने या प्रकरणात अजून कुठलीही प्रतिक्रिया आली नाहीये. आयकर विभागाच्या हाती काय लागते तपासणी संपल्यावर समोर येणार आहे.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 8 October 2021 https://t.co/XynZW9JJpr #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 8, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO | तराफ्याचे इंजिन बंद, भल्या पहाटे अजित पवार धरणाच्या मधोमध अडकले
पाहुणे घरात आहेत, त्यांचं काम सुरु आहे, ते गेल्यावर भूमिका मांडतो, आयकर धाडीवर अजित पवारांचा टोला
(eknath shinde reaction on IT raid on ajit pawar related companies)