ठाणे | 11 ऑगस्ट 2023 : ठाण्यातील वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. कारण माजी खासदार आनंद परांजपे यांच्या पत्नी सोनल परांजपे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाच्या महिला पदाधिकारी रचना वैद्य यांना धमकीचा फोन करण्यात आलाय. याप्रकरणी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या पत्नी सोनल परांजपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवीगाळ करणे, धमकी देणे या कलमाखाली नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद परांजपे यांच्या पत्नी सोनल परांजपे यांच्यावर अजित पवारांच्या गटात यावं यासाठी रचना वैद्य यांना फोन करून धमकी दिल्याचा आरोप आहे. संबंधित आरोपांप्रकरणी आनंद परांजपे, सोनल परांजपे, संकेत नरणे यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात 504, 506, (2)34 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित प्रकरणामुळे ठाण्यातील वातावरण चांगलंच तापलंय. आमदार जितेंद्र आव्हाडदेखील या प्रकरणी आक्रमक झाले आहेत.
“आम्ही 3 जुलैला प्रदेश कार्यालयात असताना फोन आला. त्याचे साक्षीदार विक्रम खामकर आहेत. त्यांनी मला माझ्या मुलाचं नाव घेऊन धमकी दिली. आनंद यांच्याबरोबर का येत नाही? गुंडाबरोबर कशाला राहतेस? असे शब्द त्यांनी वापरले. तुझ्यासारख्या सुशिक्षित बाईने आमच्यासोबत राहायला हवं, असं त्या म्हणाला. मी त्यांना नाही असं स्पष्ट सांगितलं”, अशी प्रतिक्रिया रचना वैद्य यांनी दिली.
“नंतर त्यांचा फोन आला तेव्हा त्यांची बोलण्याची भाषाच बदलली. आम्हाला तुझ्या मुलाचं रुटीन माहिती, कशाला त्याला त्रास होईल, असं वागते, काय ते समज, ये इकडे, अशी धमकी देण्यात आली. आनंद परांजपे यांच्या पत्नी सोनल परांजपे यांनी ही धमकी दिली”, असा आरोप रचना वैद्य यांनी केला.
जितेंद्र आव्हाड यांनीदेखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. “जे घडलेलंच नाही त्या घटनेविरोधात ते खोटे गुन्हे दाखल करतात. पण आमच्याकडे खरे गुन्हे दाखल झाले आहेत. ही माझी बहीण आहे. 40 ते 45 जणांना धमकीचे फोन गेले आहेत. आम्ही शांत बसतो. आग लगेगी तो दूरतक जाएँगी. आम्ही शांत बसतो. आम्हाला काही करायचं नाही. आम्ही शांत राहू. आम्ही कधी मस्ती करत नाहीत. आम्ही आमचे कार्यक्रम करतो. तुम्हाला कार्यक्रम नाहीत म्हणून खोटे गुन्हे दाखल करता?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.
“आम्ही खरे गुन्हे दाखल करु. या बाईला तुझा मुलगा कोणत्या वाटेने येतो-जातो हे बोलण्याचं काही कारण आहे का? अजून तर आमच्याकडे खूप टेप आहेत. साडी सोडेन. आम्हाला सत्य सांगावं लागलं तर बघा. राजकारणात इतक्या टोकाला जाऊ नका, अजून एकच महिना झालेला आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.