कल्याणमध्ये चाललं तरी काय? ठाकरे गटाच्या नेत्याची भाजप आमदारासोबत बंददाराआड चर्चा; शिंदे गटाला धोक्याची सूचना?

| Updated on: Jun 15, 2023 | 8:41 AM

शिंदे गट आणि भाजपमध्ये कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावरून वाद सुरू आहे. हा वाद सुरू असतानाच ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

कल्याणमध्ये चाललं तरी काय? ठाकरे गटाच्या नेत्याची भाजप आमदारासोबत बंददाराआड चर्चा; शिंदे गटाला धोक्याची सूचना?
bjp mla ganpat gaikwad
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कल्याण : कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावरून गेल्या काही दिवसात शिंदे गट आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. भाजपने या मतदारसंघावर दावा सांगितल्याने शिंदे गटाची गोची झाली आहे. हा वाद सुरू असतानाच ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनाउधाण आलं आहे. सुभाष भोईर भाजपमध्ये प्रवेश करणार की भोईर-गायकवाड भेट हा शिंदे गटासाठी सूचक इशारा आहे? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात गेले काही दिवसापासून दररोज एक नवा वाद होत आहे. युतीत असलेले भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद होताना दिसून येत आहे. यातच अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे पिता-पुत्रांना कुठलीही मदत करायची नाही, असा ठरावही बैठक घेऊन मांडला होता. हा वाद सुरू असतानाच याच मतदारसंघात ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख आणि माजी आमदार सुभाष भोईर याच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार सुभाष भोईर… असं लिहिलेले बॅनर्स लावण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

सदिच्छा भेट नव्हतीच

तर दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचेही तीन दौरे झाले. हे सर्व सुरू असतानाच भावी खासदार म्हणून ज्यांचे कल्याणमध्ये बॅनर्स लागले त्या सुभाष भोईर यांनी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांची भेट घेतली. गणपत गायकवाड यांचा काल वाढदिवस होता. या पार्श्वभूमीवर ही भेट त्यांनी घेतली. पण ही भेट केवळ सदिच्छा भेट राहिली नाही. दोन्ही नेत्यांनी बंददाराआड चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

भेटीच्या माध्यमातून इशारा

बंद दरवाजाआड या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असावी? सुभाष भोईर लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच करत आहे का? की भोईर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत? की श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात लढण्यासाठी बळ मिळावं म्हणून भोईर यांनी आतापासूनच सेटिंग सुरू केलीय? असे सवाल या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

राजकीय वर्तुळात एवढ्या सर्व घडामोडी होत असताना सुभाष भोईर आणि गणपत गायकवाड यांची भेट राजकीयदृष्टया महत्वाची मानली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची डोकेदुखी वाढवण्यासाठी तर गणपत गायकवाड यांनी भोईर यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली नाही ना? ही भेट म्हणजे शिंदे गटासाठी सूचक इशारा तर नाही ना? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

आमचे घरोब्याचे संबंध

दरम्यान, भोईर यांच्याशी आमचे घरचे संबंध आहेत. सभागृहात सुद्धा आम्ही एकत्र काम केले आहे, ते मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते, असं गणपत गायकवाड यांनी सांगितलं. असे असले तरी बंद दरवाजाआड या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असावी? असा सवाल आता उपस्थिती होत आहे.