आईच्यासमोर आजोबांच्या हातून बाळ निसटलं, पाच तासांपासून चिमुरडी बेपत्ता, काळीज पिळवटणारी दुर्घटना

| Updated on: Jul 19, 2023 | 8:44 PM

कल्याण-ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान आज एक अतिशय मन हेलावणारी घटना घडली आहे. सहा महिन्यांची चिमुकली आपल्या आजोबांच्या हातून निसटली आणि नाल्यात पडली. चिमुकलीच्या आईच्यासमोर ही दुर्घटना घडली.

आईच्यासमोर आजोबांच्या हातून बाळ निसटलं, पाच तासांपासून चिमुरडी बेपत्ता, काळीज पिळवटणारी दुर्घटना
Follow us on

ठाणे | 19 जुलै 2023 : सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला. रेल्वे सेवा संथगतीने सुरु असल्याने डोंबिवली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान दुपारी लोकलच्या रांगा लागल्या. याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली. लोकल बराच वेळ सुरु असल्याने प्रवाशांनी रुळावरुन चालत स्टेशन गाठण्याचा प्रयत्न केला. याचवेळी दुपारी 3च्या सुमारास भिवंडीमध्ये राहणारी एका महिला आपल्या नातेवाईकांसह ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान रुळावरुन चालत प्रवास करत होती. यादरम्यान अचानक नाला ओलांडत असताना आजोबांच्या हातून चिमुरडी निसटली आणि थेट नाल्यात पडली. सध्या या सहा महिन्यांच्या मुलीचा शोध कल्याण डोंबिवली लोहमार्ग पोलीस, रेल्वे पोलिसांसह इतर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांकडून शोध सुरु आहे.

अंबरनाथ, बदलापूर दरम्यान रुळांवर पावसाचे पाणी साचले आणि त्याचा फटका मध्य रेल्वेला बसला. मध्य रेल्वेची वाहतूक संथ गतीने सुरु असल्याने डोंबिवली ते कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलच्या रांगा लागल्या होत्या. लोकल बराच वेळ सुरु असल्याने प्रवाशांनी रुळांवरुन चालत स्टेशन गाठण्याचा प्रयत्न केला.

नेमकं काय घडलं?

दुपारच्या सुमारास कल्याण-ठाकुर्ली दरम्यान लोकल जवळपास एक ते दोन तास एकाच ठिकाणी उभी असल्याने भिवंडीत राहणाऱ्या योगिता रुमाले या नातेवाईकांसह रेल्वेखाली उतरल्या आणि पायी चालू लागल्या. ही महिला हैद्राबाद येथे राहण्यास असून ती डिव्हलरीसाठी भिवंडी येथे आई-वडीलांकडे आली होती.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, बुधवारी बाळाचे चेकअप असल्याने आई आणि आजोबा बाळाला घेऊन मुंबई येथील रुग्णालयात गेले होते. तिथून परतत असताना त्यांनी अंबरनाथ लोकल पकडली. डोंबिवली ते कल्याण दरम्यान एक ते दोन तास लोकल उभी असल्याने त्यांनी रेल्वेतून उतरुन पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला.

महिलेने दुपारी 3 वाजेच्या सुमारास आपल्या नातेवाईकांसह ट्रेनमधून उतरत ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान रुळांवरुन चालत प्रवास सुरू केला. याच दरम्यान रेल्वे रुळावर योगिता यांना चालता येत नसल्याने त्यांनी आपल्या हातातली बाळ वडिलांकडे दिलं . ठाकुर्ली जवळील नाल्याजवळ आजोबांचा तोल गेला आणि त्यांच्या हातून चिमुरडी निसटली. ती थेट नाल्यात पडली.

यावेळी चिमुरडीच्या आई आणि आजोबांनी आरडाओरडा करत बाळ पडल्याची माहिती सहप्रवाशांना दिली. त्यानंतर कल्याण आणि डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. स्थानिक कोळी बांधव, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या सहाय्याने बाळाचा शोध सुरु आहे. संबंधित घटनेला चार ते पाच तास उलटले असून अद्याप बाळाचा शोध लागलेला नाही. रेल्वे पोलीस आणि अग्निशमन दलाकडून अजूनही बाळाचा शोध सुरू आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर बाळ सुखरुप सापडल्याचं खोटं वृत्त व्हायरल होत आहे.