उल्हासनगर : बांधकाम व्यवसायात गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचं आमिष दाखवत वृद्धांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचं प्रकरण उल्हासनगरात उघडकीस आलं आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी 8 बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. सुंदर बजाज, लाल बजाज, हिरासिंग आइलसिंघानी, मनमोहन आइलसिंघानी, फेरू लुल्ला, नंदलाल लुल्ला, गोविंद मनचंदा आणि ओम मनचंदा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत.
उल्हासनगरात शहरातील 37 ज्येष्ठ नागरिकांनी जानेवारी 2017 मध्ये उल्हासनगरच्या सद्गुरू डेव्हलपर्स या विकासकाकडे 5 कोटी 54 लाख रुपयांची गुंतवणूक केली. याचा मोबदला म्हणून कल्याणला नव्याने सुरू होत असलेल्या प्रकल्पात दुकानं, घरं किंवा जादा रक्कम परतावा म्हणून देण्याचं आमिष या विकासकांनी दाखवलं होतं. मात्र काही कालावधीनंतर या विकासकाकडे परतावा मागितला असता तो टाळाटाळ करू लागला. तसंच त्यांनी या गुंतवणूकदारांना कुठेही दुकानं किंवा घरं सुद्धा दिली नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या 37 गुंतवणुकदारांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात 23 नोव्हेंबर 2021 रोजी सद्गुरू डेव्हपर्स विरोधात गुन्हा दाखल केला.
मात्र गुन्हा दाखल होऊन 22 दिवस उलटले, तरी पोलिसांनी याप्रकरणी कोणत्याही विकासकाला अटक केलेली नाही. त्यामुळे हे सर्वजण शहरात मोकाट फिरत असल्याचा आरोप तक्रारदार किशोर दादलानी यांनी केला आहे. तसंच आम्ही सर्व निवृत्त नागरिक असून आमची आयुष्यभराची पुंजी आम्ही या गुंतवणुकीत लावली आहे. त्यामुळे आम्हाला आमचे पैसे परत मिळावेत, अशी मागणी या वृद्ध गुंतवणूकदारांनी केली आहे. याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना विचारलं असता, आम्ही गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. (Fraud of senior citizens in Ulhasnagar by offering high returns)
इतर बातम्या
Video | Shocking | Tragedy | गळफास घेण्याची एक्टिंग करताना स्टूलवरुन पडला आणि…