अंबरनाथ : अंबरनाथ शहरात ओला-सुका कचरा प्रश्न पेटला आहे. कारण मागील 7 दिवसांपासून पालिकेनं सोसायट्यांमधला ओला कचरा उचलणं बंद केलंय. त्यामुळं शहरातल्या 81 मोठ्या आणि 170 छोट्या सोसायट्यांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अंबरनाथ पालिकेनं शहरातील सोसायट्यांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वतः लावण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत मागील दोन ते तीन वर्षांपासून तब्बल 5 वेळा शहरातील सोसायट्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. (Garbage issue erupts in Ambernath city; The municipality stopped picking up wet garbage)
नव्याचे नऊ दिवस नियम पाळल्यानंतर सोसायट्या पुन्हा ओला कचरा घंटागाडीत टाकायला सुरुवात करतात. त्यामुळं पालिकेनं जुलै 2021 मध्ये शहरातील दिवसाला 100 किलोपेक्षा जास्त कचरा तयार होणाऱ्या 81 मोठ्या आणि 170 छोट्या सोसायट्यांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वतः लावावी, अशी अंतिम नोटीस दिली होती. मात्र तरीही या आदेशाची अंमलबजावणी सोसायट्या करत नसल्यानं अखेर मागील 7 दिवसांपासून पालिकेनं या सर्व सोसायट्यांमधला कचरा उचलणं बंद केलं होतं. त्यामुळं सगळ्याच सोसायट्यांमध्ये अक्षरशः कचऱ्याचे ढीग लागले होते. त्यामुळं आज अखेर नागरिकांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत आम्हाला वेळ वाढवून देण्याची मागणी केली.
दुसरीकडे सत्ताधारी शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी नागरिकांना आणखी थोडा वेळ देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे तूर्तास सणासुदीचे दिवस असेपर्यंत कचरा उचलू, पण नंतर पुन्हा कचरा उचलणं बंद करणार असल्याची भूमिका नगरपालिकेने घेतली आहे. या सगळ्याबाबत अंबरनाथ नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख सुरेश पाटील यांना विचारलं असता, आम्ही पालिकेच्या वतीनं सोसायट्यांना वारंवार लेखी नोटीसा दिल्या असून स्वच्छता निरीक्षक, प्रभागनिहाय ब्रँड अँबेसेडर यांनी प्रत्यक्ष जाऊन अनेकदा जनजागृती केली असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र यानंतरही सोसायट्या जर पालिकेच्या आदेशाला गांभीर्यानं घेत नसतील, तर कठोर भूमिका घेणं गरजेचं असल्याचं सुरेश पाटील यांनी स्पष्ट केलं. तर नागरिकांनी मात्र पालिकेच्या या कठोर भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. तूर्तास काही दिवस सोसायट्यांवरील हे कचरासंकट टळलं असलं, तरी सणासुदीचे दिवस झाल्यावर मात्र सोसायट्यांना आपल्या ओल्या कचऱ्याची स्वतःच विल्हेवाट लावावी लागणार आहे, अशी भूमिका पालिकेनं घेतली आहे. त्यामुळं आता सोसायट्यांना स्वतःची कचरा विघटन यंत्रणा उभारणं क्रमप्राप्त झालं आहे. (Garbage issue erupts in Ambernath city; The municipality stopped picking up wet garbage)
पुण्यात भरदिवसा घरफोडी, चोरट्याला पकडण्यासाठी मागे धावलेल्या तरुणावर गोळीबार, भयानक थरारhttps://t.co/VGsd4MvHzk#Pune #PuneCrime #CrimeNews #Thief
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 2, 2021
इतर बातम्या